Dharashiv Fire News: रविवारी संपूर्ण देश दिवाळीच्या जल्लोषात रंगला असतानाच धाराशिवमधून एक दुदैवी घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री अचानक घराने पेट घेतला. यादरम्यान घरात असलेल्या सहा जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. गोविंद करंडे यांच्या घराला ही आग लागली यात सहा जणांचा मृत्यू झाला असून एका व्यक्तींवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
गोविंद करंडे यांचे दोन मजली घर असून तळघरात करंडे किराणा अँड जनरल स्टोअर असे दुकान असून या किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर करंडे कुटुंब राहत होते. मध्यरात्रीच्या सुमारास घराला अचानक आग लागली व यात ६ जणांचा दुदैवी अंत झाला. मध्यरात्रीपासून गावकरी आणि अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
रात्री 2.30 च्या सुमारास ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजून समजू शकलेलं नाही. मात्र दिवाळीनिमित्त घरात पणत्या लावलेल्या होत्या. या पणत्यांमुळेच आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीची घटना घडली, त्यावेळी सर्वजण झोपेत होते, त्यामुळे कोणालाच प्राण वाचवण्याची संधी मिळाली नाही. या घरातील एक मुलगा बाहेर आल्याने तो या आगीतून बचावला.
दिवाळीदिवशी राज्यात जवळपास 70 ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. विरार, ठाणे, अंधेरी, डोंगरी, विद्याविहार आदि भागात रहिवाशी इमारतींना आगी लागल्या. त्याचवेळी भायखळा डोंगरी भागात दुकानांना आगी लागण्याच्या घटना घडल्या. या अग्नितांडवात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
