ठाणे. राज्यभरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह सुरू असतानाच ठाण्यात आगीच्या भीषण घटनेने खळबळ उडाली. वागळे इस्टेट परिसरातील रहेजा गार्डन संकुलातील ‘कार्लाइन’ या 17 मजली निवासी इमारतीला रविवारी रात्री भीषण आग लागली. इमारतीच्या नवव्या मजल्यावर लागलेल्या आगीने काही वेळातच वरच्या मजल्यांकडे फैलाव केला आणि ती 17 व्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली.

रविवारी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीच्या सणामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असतानाच इमारतीतून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले. आगीची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ सुरू केली. काही रहिवासी इमारतीबाहेर पडले, तर काही जणांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. आगीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आगीमुळे रहिवाशांमध्ये घबराट; अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य

आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. आगीचा धूर अनेक मजल्यांवर पसरल्याने बचावकार्य करताना जवानांना विशेष खबरदारी घ्यावी लागली.

या मोहिमेसाठी अग्निशमन दलाच्या गाड्या, ब्रँटो स्काय लिफ्ट, पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आले. अग्निशमन जवानांनी इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यावर प्राधान्य दिले. प्राथमिक माहितीनुसार, 20 ते 25 रहिवाशांची सुटका करण्यात आली. काही नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एकनाथ शिंदेंची घटनास्थळी धाव; अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बचावकार्याची माहिती घेतली. तसेच इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिले आहे. 

    या वेळी शिंदे यांनी रहिवाशांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिले. घटनास्थळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

    आगीचे कारण अद्याप अस्पष्ट; मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

    दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे आग लागली असावी का, याचीही शक्यता तपासली जात आहे. मात्र, अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.