बीड. माजलगाव शहरातील गढी रोडवर झालेल्या भीषण अपघातात गायकवाड दाम्पत्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या अपघातातील अल्पवयीन चालक अनुज नाईकनवरे याचे वडील संभाजी नाईकनवरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील कलम 199-अ ची वाढ करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अपघातप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

माहितीनुसार, माजलगाव येथील गढी रोडवर अल्पवयीन चालकाच्या वाहनामुळे भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत गायकवाड दाम्पत्याला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत होता. अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन कसे देण्यात आले आणि त्यासाठी पालकांची जबाबदारी काय, असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

मोटार वाहन कायद्यातील या तरतुदीनुसार, अल्पवयीन मुलाने वाहन चालवून अपघात घडविल्यास त्याच्या पालकांवर किंवा वाहनाच्या मालकावरही जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. त्यामुळे अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून संभाजी नाईकनवरे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन चालक कोण होता, यावरूनही सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. भाजपचे नगरसेवक दीपक मेंडके यांनी आपला मुलगा दक्ष मेंडके हा अपघाताच्या वेळी कार चालवत नसल्याचा दावा केला होता. त्यावेळी कारमध्ये अनुज नाईकनवरे हा वाहन चालवत असल्याचे त्यांनी सांगितले होते. या दाव्याच्या समर्थनार्थ वाहनातील व्हिडिओ पोलिसांना सादर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी उपलब्ध व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली.

वडिलांना न्यायालयात, मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर करणार

पोलिसांनी संभाजी नाईकनवरे यांना अटक केली असून त्यांना माजलगाव येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दुसरीकडे, अल्पवयीन अनुज नाईकनवरे याला बीड येथील बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे. या दोघांविरोधातील पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे आता लक्ष लागले आहे.

    अपघाताच्या तपासाला महत्त्वाचे वळण

    20 नोव्हेंबर रोजी माजलगावच्या गढी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला होता. प्रल्हाद गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सुनीता गायकवाड हे दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या दुर्घटनेत प्रल्हाद गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सुनीता गायकवाड यांचाही मृत्यू झाला.

    अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर घटनेची भीषणता उघड झाली होती. तसेच दोन वाहनांमध्ये शर्यत सुरू असल्याच्या चर्चाही पुढे आल्या होत्या. मात्र, शर्यतीचा प्रकार अधिकृतपणे सिद्ध झालेला नाही.