सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या दुधनी शहरात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आलेल्या चौघांच्या टोळक्याने एका मोबाईल शॉपीमध्ये घुसून 30 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात महेश गुड्डोडगी यांचा मृत्यू झाला. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महेश गुड्डोडगी हे दुधनी शहरातील एका मोबाईल शॉपीमध्ये होते. यावेळी जुन्या वादातून चौघे जण दुकानात आले. त्यांनी महेश यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्ल्याचे स्वरूप गंभीर असल्याने महेश यांना बचावाची संधीही मिळाली नाही. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या महेश यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दुधनी शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

शिवा मोबाईल शॉपीमध्ये घडला थरार

दुधनी नगरपालिकेच्या गाळ्यात असलेल्या शिवा मोबाईल शॉपीमध्ये महेश बसले होते. यावेळी सचिन बसवराज कौलगी याच्यासह अन्य तीन तरुण दुकानात आले. सुरुवातीला त्यांनी महेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सचिन याने चाकू काढला आणि तो लोखंडी पाइपमध्ये ठेवून त्याच पाइपने महेश यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेश यांचा मृत्यू झाला.

भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

    या प्रकरणी मृत महेश यांचे भाऊ शिवकुमार धानप्पा गुड्डोडगी (वय 32) यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री संबंधित संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तयार केली आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटकातही आरोपींचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने करीत आहेत.

    दुधनी शहरात भीतीचे वातावरण

    दिवसा ढवळ्या, शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या मोबाईल दुकानात घुसून तरुणाची हत्या करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुन्या वादातून थेट दुकानात घुसून हल्ला करण्यापर्यंत आरोपींची मजल गेल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या हत्याकांडातील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.