भंडारा. भंडारा जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय विकृत मानसिकतेच्या तरुणाने अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे चिमुरडीची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात मोठा संताप व्यक्त करण्यात आला.

माहितीनुसार, आरोपीने चिमुरडीला एकांतात नेऊन तिच्याशी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या रडण्याचा आवाज आणि संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. नागरिकांनी आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केली.

आपल्याला नागरिकांकडून मारहाण होऊ शकते, याची जाणीव होताच आरोपीने स्वतःलाच जखमी करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

रात्री उशिरापर्यंत परिसरात मोठी गर्दी जमली होती. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती शांत झाली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सोबतच अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारांपासून संरक्षणासाठी असलेल्या पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला असून घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांनी मुलांवर सतत लक्ष ठेवावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.