पुणे. Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्सप्रेस वे) मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या फॉर्च्यूनर कारने मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याने कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर सुमारे दोन तास मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फॉर्च्यूनर कारचा मिसिंग लिंक बोगद्यात मालवाहू टेम्पोवर ताबा सुटल्याने जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

या अपघातात तुषार भूमकर (रा. वाकड, पिंपरी-चिंचवड) यांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कारमधील उर्वरित तीन जण सुखरूप बचावले आहेत. फॉर्च्यूनरमधील सर्व पाच जण पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 अपघातानंतर वाहतूक कोंडी -

अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे दोन तास मिसिंग लिंक मार्गावर बंद ठेवण्यात आली. या काळात सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस यंत्रणा आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने महामार्गावरून हटविण्यात आली.

    वाहने हटवून रस्ता सुरक्षित केल्यानंतर मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वेग, निष्काळजीपणा किंवा अन्य तांत्रिक कारणांचा तपास महामार्ग पोलीस करत आहेत.

    या अपघातामुळे पुन्हा एकदा द्रुतगती मार्गावर वेगमर्यादेचे पालन, सुरक्षित अंतर राखणे आणि बोगद्यात वाहन चालविताना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.