मुंबई - महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावत अनेक भागांत अतिवृष्टीचा तडाखा दिला आहे. मुंबईत समुद्रात मोठी भरती येण्याचा इशारा देण्यात आला असून, नाशिक जिल्ह्यात काही भागांत ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. विविध जिल्ह्यांतील प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी सुरू असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
वारकऱ्यांना विशेष आवाहन
सध्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाले ओलांडताना किंवा पाण्याच्या प्रवाहात जाण्याचे टाळावे, तसेच धोकादायक ठिकाणी थांबू नये, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना
मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना 24 तास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने मदत व बचावकार्य सुरू ठेवण्यास, तसेच आवश्यकतेनुसार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.
नागरिकांना आवाहन
प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे, समुद्रकिनाऱ्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचे, तसेच मुसळधार पाऊस आणि मोठ्या भरतीच्या काळात किनारी भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे मानले जात असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
शासकीय यंत्रणा 24 बाय 7 'अलर्ट मोड'वर ठेवा -मु्ख्यमंत्री
मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग 50 ते 70 किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच आज दुपारी 3 ते 4.30 वाजे दरम्यान समुद्राला भरती येण्याची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी 24 बाय 7 अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती आल्यास तातडीने मदत कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये , असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
