एजन्सी, लातूर. Bird Flu in Maharashtra: लातूर जिल्ह्यात काही दिवसापूर्वीच 60 पेक्षा अधिक कावळ्यांचा बर्ड फ्लूने मृत्यु झाला होता. यातच आता एका पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 4,200 कोंबड्याच्या पिल्ल्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू (Bird Flu in Latur) झाला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

अहमदपूर तहसीलमधील ढालेगाव गावात पाच ते सहा दिवसांच्या कोंबड्यांच्या पिलांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेहांचे नमुने बुधवारी औंध, पुणे येथील राज्य पशु रोग निदान प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, असं पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

 4,500 पिल्लांपैकी 4,200 पिल्लांचा मृत्यु

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे म्हणाले की त्यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन ते तीन दिवसांत कोंबड्यांचे पिल्ले मृत्युमुखी पडले. पोल्ट्री फार्म मालकाने मृतांबद्दल अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती दिली नाही, ज्यामुळे संसर्ग पसरला आणि त्याने खरेदी केलेल्या 4,500 पिल्लांपैकी 4,200 पिल्लांचा मृत्यु झाला, असे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांने केलं आवाहन

    अहमदपूर पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उपायुक्त डॉ. शिवाजी क्षीरसागर यांनी मालकांना त्यांचे पोल्ट्री फार्म नोंदणीकृत करण्याचे आणि अशा घटना घडल्यास स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

    60 कावळ्यांचा मृत्यू

    या महिन्याच्या सुरुवातीला, जिल्ह्यातील उदगीर शहरात सुमारे 60 कावळे मृत आढळले होते. पुणे येथील प्रादेशिक रोग निदान प्रयोगशाळा आणि भोपाळ येथील आयसीएआर - राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्था यांनी केलेल्या चाचण्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे त्यांचे मृत्यू झाल्याचे निष्पन्न केलं होतं, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.