जेएनएन, पुणे: गिलेन-बॅरे सिंड्रोम या नव्या रोगानं पुणेकरांची चिंता वाढवली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात बुधवारपर्यंत गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या संशयित रुग्णांची संख्या 59 वर पोहोचली आहे. एका दिवसांत 35 नवीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली (GBS Cases increased In Pune) आहे.
रुग्णांची संख्या झाली 59
पुण्यात विविध खाजगी रुग्णालयांमध्ये मंगळवारी 24 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यात गिलेन-बॅरे सिंड्रोमच्या संशयीत रुग्णांची संख्या 59 झाली (GBS Cases In Pune) आहे. माहितीनुसार, संशयित रुग्णांमध्ये पुणे ग्रामीण भागातील 33, पुणे शहरातील 11 आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील 12 जणांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, शेजारच्या जिल्ह्यांतील 3 रुग्ण पुण्यात उपचार घेत आहेत.
12 रुग्णांना व्हेंटिलेटर सपोर्ट
बाधित व्यक्तींमध्ये 39 पुरुष आणि 20 महिला आहेत, तर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता असलेल्या 12 रुग्णांचा समावेश आहे. नवीन रुग्णांमध्ये पुणे शहर आणि त्याच्या आसपासच्या भागातील रुग्णांचा समावेश आहे, ज्यामध्ये नांदेड गाव, नांदोशी, किरकिटवाडी, धायरी आणि खडकवासला यांचा समावेश आहे.
जनजागृती मोहिमा सुरु
राज्याच्या जलद प्रतिसाद पथकाला पुण्यातील प्रभावित भागात देखरेख सुरू करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य सेवांच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी एका वृत्तसंस्थेला बोलताना दिली आहे. तसंच, रुग्णांचे रक्तांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठवण्यात आले आहेत, तर बाधित भागातील पाण्याचे नमुने राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत विश्लेषणाधीन आहेत. समुदायाला माहिती देण्यासाठी जनजागृती मोहिमा देखील राबवल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं.
नागरिकांना घाबरु नये
नागरिकांना घाबरण्याची गरज नाही, आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत असून या समस्येच्या निरासणासाठी सज्ज आहे, असं डॉ. कमलापूरकर म्हटलं आहे.