नाशिक. भोंदू बाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याआधी दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जमीन हडपल्याचा गंभीर आरोप!
अशोक खरातवर अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत जमीन हडपल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मिरगाव येथील माळी कुटुंबाने केलेल्या तक्रारीनुसार, खरातने “जमीन शापित आहे” असा बनाव रचत संबंधित कुटुंबाला मृत्यूची भीती दाखवली. या भीतीचा फायदा घेत सुमारे १६ लाख रुपये किमतीची जमीन केवळ ४ लाखांत विकत घेतल्याचा आरोप आहे. याच जमिनीवर नंतर ‘इशान्येश्वर महादेव मंदिर’ उभारण्यात आल्याचेही समोर आले आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून संपत्ती बळकावण्याचा हा प्रकार असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
नाफेड कांदा खरेदी घोटाळ्यात सहभागाचा आरोप-
दरम्यान, खरातच्या अडचणी आणखी वाढवणारी माहिती समोर आली आहे. नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्यातही त्याचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे.‘श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’च्या माध्यमातून हे व्यवहार करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, मार्च 2024 मध्ये सुमारे २५० पेक्षा अधिक कंपन्या इच्छुक असताना, या कंपनीला संशयास्पदरीत्या नाफेडची मान्यता मिळाल्याचा आरोप आहे. या कंपनीत अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना हे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती असून, नाफेड आणि NCCFच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले आहे.अंधश्रद्धा, जमीन हडप आणि आर्थिक गैरव्यवहार अशा अनेक आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या अशोक खरात प्रकरणात पुढे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
