नाशिक/शिर्डी - भोंदूगिरी करून शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे 17 मार्च 2026 रोजी अटक झालेला अशोक खरात सध्या तुरुंगात असला, तरी त्याच्या मालकीच्या आंबा बागेतून यंदा मोठे उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर आली आहे. खरातच्या 16 एकर क्षेत्रातील केशर आंब्याच्या बागेतून या हंगामात अंदाजे ₹15 लाखांचे उत्पन्न मिळाले असून, त्याच्या अटकेनंतरही शेती आणि व्यावसायिक व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसून येत आहे.

16 एकर बागेतून 1200 ते 1500 क्रेट उत्पादन-

माहितीनुसार, खरातच्या मालकीच्या जमिनीवरील केशर आंब्याच्या बागेतून यंदा सुमारे 1200 ते 1500 क्रेट आंब्यांचे उत्पादन घेण्यात आले. हे आंबे एका व्यापाऱ्याला सरासरी ₹1000 प्रति क्रेट दराने विकण्यात आले. त्यामुळे बागेतून जवळपास ₹15 लाखांचे उत्पन्न मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

खरात तुरुंगात असला तरी बागेची देखभाल, उत्पादन विक्री आणि इतर आर्थिक व्यवहार त्याचे नातेवाईक आणि मुले सांभाळत असल्याने व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही या बागेतून सुमारे 2 हजार क्रेट आंब्यांची विक्री झाल्याची नोंद आहे.

मंदिरातील गर्दी ओसरली-

दरम्यान, खरातच्या मीरगाव येथील आलिशान बंगल्यासह विविध मालमत्तांची चौकशी सुरू आहे. त्याच्या अटकेनंतर बंगल्याजवळील महादेव मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे सांगितले जात आहे.

    मंदिरातील कर्मचारी आणि पुजारी गेल्या तीन महिन्यांपासून नियमित वेतनाशिवाय काम करत असून आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. खरातच्या प्रभावामुळे पूर्वी मंदिर परिसरात मोठी वर्दळ असायची, मात्र अटकेनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

    समता पतसंस्थेतील 100 खात्यांचा तपास-

    खरातविरोधातील आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत अशोक खरात नॉमिनी असलेली तब्बल 100 बँक खाती आढळून आली आहेत. ही खाती 57 वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर असल्याचे तपासात उघड झाले आहे.

    या खात्यांमधून सुमारे ₹70 कोटींचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तपास यंत्रणांचे लक्ष आता या व्यवहारांकडे केंद्रित झाले आहे. शिर्डी पोलिसांनी आतापर्यंत 57 पैकी 31 खातेदारांच्या सह्यांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. उर्वरित खातेदारांच्या सह्यांची पडताळणी झाल्यानंतर तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.

    एसआयटीकडे तपास वर्ग होण्याची शक्यता

    मुंबईतील उद्योजक दिनेश परब यांच्या फिर्यादीवरून दोन महिन्यांपूर्वी शिर्डी पोलिस ठाण्यात अशोक खरात आणि समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.माहितीनुसार, विशेष तपास पथक (SIT) ने या गुन्ह्याची सविस्तर माहिती मागवली असून पुढील काही दिवसांत संपूर्ण तपास एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.