शिर्डी. अशोक खरात या भोंदूबाबाच्या कारनाम्यांचा नवा अध्याय समोर आला आहे. शिर्डी येथे भाविकांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भाविकांच्या पॅनकार्डचा गैरवापर करून तब्बल 56 बनावट बँक खाती उघडल्याचा आरोप खरातवर करण्यात आला आहे.
पॅनकार्डचा गैरवापर कसा केला?
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून विविध कारणांनी कागदपत्रे घेतली जात होती. या कागदपत्रांमध्ये पॅनकार्डची माहिती मिळवून त्याचा गैरवापर करण्यात आला. त्यानंतर त्या पॅनकार्डच्या आधारे बनावट सह्या करून खाती उघडण्यात आली.
56 बनावट खाती उघडल्याचा प्रकार!
समता पतसंस्था येथे एकूण 56 बनावट खाती उघडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांद्वारे आर्थिक व्यवहार करून मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचा संशय-
या बनावट खात्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाला का, किंवा इतर फसवणूक व्यवहारासाठी यांचा वापर झाला का, याचा तपास सुरू आहे. पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.
भाविकांची फसवणूक!
शिर्डीसारख्या धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेक भाविकांना त्यांच्या नावावर खाती उघडली गेल्याची माहितीही नव्हती.
तपास यंत्रणांची हालचाल!
या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून, खरातच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. त्याच्यासोबत इतर सहकारीही यात सहभागी आहेत का, याचा तपास सुरू आहे.
