जेएनएन, नाशिक. नाशिक येथील लैगिंक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला नाशिक सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार खरात 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. चौथ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

सुनावणीदरम्यान तांत्रिक अडचण

सुनावणी सुरू असताना अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली. VC द्वारे कोर्टातील आवाज आरोपीपर्यंत पोहोचत नसल्याने न्यायालयीन प्रक्रिया सुमारे 10 ते 12 मिनिटे थांबवावी लागली. त्यानंतर कोर्टात उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मोबाईलवरून संबंधित पोलीस अधिकाऱ्याशी व्हिडीओ कॉल करून अशोक खरातशी संपर्क साधण्यात आला. संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली.

न्यायालयाचा सवाल, आरोपीचे उत्तर

या दरम्यान न्यायाधीशांनी अशोक खरातला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का, असा सवाल केला. त्यावर “नाही” असे उत्तर आरोपीने दिले. 

गंभीर आरोपांचा तपास

    • सरकारी पक्षाकडून सुनावणीदरम्यान धक्कादायक बाबी मांडण्यात आले आहेत. 
    • आरोपी महिलांना तथाकथित “ताब्याच्या भांड्यातील पाणी” आणि पेढे देत होता. 
    • त्या पदार्थांमध्ये गुंगीचे औषध मिसळले जात असल्याचा संशय आहे. 
    • कोणते औषध वापरले जात होते, याचा शोध घेणे आवश्यक आहे. 
    • “मी देवाचा अवतार आहे, संबंध ठेवल्याने तू पवित्र झाली आहेस” असे सांगून महिलांची फसवणूक करत होता. 
    • भोंदूगिरी करून महिलांना रत्न देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करत होते.या सर्व मुद्द्यांच्या तपासासाठी पोलिसांनी अधिक कोठडीची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.

    पुढील तपासात मोठे खुलासे शक्य!

    या प्रकरणात आधीच अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. चौथ्या गुन्ह्यातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. पोलिस आता आरोपीकडून वापरण्यात आलेल्या औषधांचा स्रोत, संभाव्य सहकारी आणि पीडितांची संख्या याबाबत सखोल तपास करत आहेत.