जेएनएन, अमरावती. Amravati Prahar Protest: राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये प्रहार संघटनेने तीव्र आंदोलन केले.
कृषी मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रे फेकून निषेध नोंदवला. कृषी मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे आणि चपलांनी मारून तीव्र नाराजी दर्शवली.
मंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी
विधानभवनातून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांच्या हिताचे निर्णय अपेक्षित असताना कृषी मंत्री मात्र खेळण्यात दंग आहेत, अशा शब्दांत आंदोलकांनी टीका केली. तसेच अशा मंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात आली आहे.