अमरावती. Amravati farmer suicide: मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून अमरावती जिल्ह्यातील एका 45 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावंगा गुरव येथे ही घटना घडली. संदीप अवधूत कर्डे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
माहितीनुसार, संदीप कर्डे यांच्याकडे एक हेक्टर शेती होती. शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कर्डे यांच्यावर मायक्रो फायनान्स कंपनीचे सुमारे दीड लाख रुपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी कंपनीकडून तगादा लावला जात असल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. याच त्रासातून त्यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास झाल्यानंतर आत्महत्येमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.
पालकमंत्री बावनकुळेंकडून घटनेची गंभीर दखल
या घटनेची जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना धमकावले जात असल्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. कोणत्याही शेतकऱ्याला कर्जवसुलीसाठी धमकी देऊ नये, अशा स्पष्ट सूचना यापूर्वीच सर्व फायनान्स कंपन्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, कर्जवसुलीच्या त्रासामुळे एखादा शेतकरी अडचणीत असेल, तर त्याने एकदाच प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना याची माहिती द्यावी. त्यानंतर शेतकऱ्याला होणारा त्रास थांबवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. फायनान्स कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना धमकावू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर प्रश्नचिन्ह
ग्रामीण भागात महिला बचत गट, शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जपुरवठा केला जातो. मात्र, कर्जाचे हप्ते थकल्यास काही ठिकाणी वसुलीसाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी समोर येतात. आर्थिक अडचणीत असलेल्या कर्जदारांना वारंवार संपर्क करणे, सामाजिक दबाव निर्माण करणे किंवा धमकावणे अशा प्रकारांमुळे कर्जदारांच्या अडचणी वाढत असल्याचे आरोप केले जातात.
संदीप कर्डे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर अशा प्रकारच्या वसुली पद्धतींवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. दरम्यान, संबंधित फायनान्स कंपनीने कर्जवसुलीसाठी नेमक्या कोणत्या पद्धतीचा अवलंब केला होता, याची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
