कोल्हापूर. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा आढावा घेणार असून प्रमुख कार्यक्रम अंबाबाई मंदिर परिसरातील विकास आराखड्याशी संबंधित असणार

माहितीनुसार, 20 जून रोजी अंबाबाई विकास आराखडा अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच अद्याप सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणीही करणार आहेत. या दौऱ्यात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर , कोल्हापूर परिसराच्या सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा आराखडा राबवण्यात येत आहे. भाविकांच्या सोयीसाठी गर्दी व्यवस्थापन, रस्ते सुधारणा, स्वच्छता व्यवस्था आणि सुविधा केंद्रे यांचा यात समावेश आहे.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 जूनला विकासकामांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर अमित शहा यांची जाहीर सभा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या सभेत ते केंद्र सरकारच्या विकास योजना, राज्यातील प्रकल्पांची प्रगती आणि आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची शक्यता आहे.

या दौऱ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनाने सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची तयारी सुरू केली असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. स्थानिक पातळीवरही या दौऱ्याला राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून महत्त्व दिले जात आहे.दरम्यान, दौऱ्याचे अंतिम वेळापत्रक आणि कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झाली नाही.