जेएनएन, मुंबई: सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोषी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर मुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे केलेल्या शिफारशीनुसार माणिकराव कोकाटेंकडील सर्व मंत्रीपदे (खाती) काढून घेण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री ठरले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून झालेल्या हालचालीनंतर राज्यपालांनीही या निर्णयाला मंजुरी दिली असून, कोकाटेंकडील महत्त्वाची खाती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, सत्ताधारी आघाडीतही चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे सदनिका गैरव्यवहार प्रकरण?
सदनिका वाटपात गैरप्रकार केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर होता. या प्रकरणात दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. अखेर न्यायालयाने दोष सिद्ध झाल्याने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षेच्या पार्श्वभूमीवर मंत्रीपदावर राहणे अडचणीचे ठरल्याने सरकारकडून तातडीने कारवाई करण्यात आली.
कोकाटेंवरील कारवाईनंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सरकार कठोर भूमिका घेत असल्याचे हे उदाहरण आहे,” असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असला, तरी विरोधकांनी “उशिरा का होईना, पण कारवाई झाली,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे आयसीयू मध्ये दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अटक वॉरंट जारी करताच कोकाटे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.शिक्षेविरोधात ते उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे .शुक्रवारी न्यायालयात कोकाटे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल, तर शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव
