जेएनएन, मुंबई: राज्यातील सरकारी नोकरभरती, विविध प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी तसेच परीक्षांमधील संघटित गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे. पेपरफुटी करणाऱ्या व्यक्ती आणि त्यामागील संघटित टोळ्यांना चाप लावण्यासाठी किमान 10 कोटी रुपयांचा दंड, सात ते दहा वर्षांपर्यंत कारावास आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने आपला दुसरा अहवाल सादर केला आहे.
सरकारी नोकऱ्यांमधील भरती प्रक्रिया आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी, बनावट उमेदवार, परीक्षेतील गैरप्रकार तसेच आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून होणाऱ्या अनियमिततेच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तसेच परीक्षा यंत्रणेवरील विश्वासालाही तडा जातो. या पार्श्वभूमीवर अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटित टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका समितीने मांडली आहे.
संघटित गैरप्रकारांसाठी स्वतंत्र कठोर तरतूद
समितीच्या शिफारशीनुसार, परीक्षांमधील संघटित गैरप्रकारात सहभागी व्यक्ती आणि संस्थांविरोधात सात ते दहा वर्षांच्या कारावासाची तरतूद करावी. याशिवाय किमान 10 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात यावा. गैरप्रकारातून मिळवलेली संपत्ती तसेच संबंधित आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही कायद्यात समाविष्ट करण्याचे सुचविण्यात आले आहे. गैरप्रकारांमुळे सरकार किंवा परीक्षा यंत्रणेचे झालेले आर्थिक नुकसानही संबंधितांकडून वसूल करण्याची शिफारस आहे.
विशेष कृती दल आणि जलदगती न्यायालये
पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर किमान अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे, तर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात किमान पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपासाची जबाबदारी देण्याची शिफारस आहे.
तसेच अशा प्रकरणांमधील खटले दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत, यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याचे सुचविण्यात आले आहे. सध्या प्रलंबित असलेली या कायद्यांतर्गतची प्रकरणे विशेष न्यायालयांकडे वर्ग करून तीन महिन्यांत निकाली काढण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रांच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा
परीक्षा केंद्रांच्या निवडीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतींची स्वतंत्र ‘व्हेन्यू बँक’ तयार करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांची क्षमता, उपलब्ध सुविधा, दिव्यांग उमेदवारांसाठी असलेली व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या निकषांची नोंद या बँकेत ठेवण्याची सूचना आहे.
सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र कक्ष
ऑनलाइन प्रणाली, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता आणि डिजिटल माध्यमातून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीमध्ये स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सीआयएसओ) नियुक्त करण्याचेही सुचविण्यात आले आहे. परीक्षा प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर नियंत्रण, मायक्रो कम्युनिकेशन डिव्हाइस, वेअरेबल कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य गैरवापरावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या यंत्रणेकडे असेल.
उमेदवारांना परीक्षा शुल्क परत मिळण्याची शक्यता
समितीने केवळ गैरप्रकार करणाऱ्यांवरील कारवाईच नव्हे, तर प्रामाणिक उमेदवारांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनाही सुचविल्या आहेत. एमपीएससीची परीक्षा प्रत्यक्ष देणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत आयोगाने विचार करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील उमेदवाराची हरकत योग्य ठरल्यास त्याने भरलेले हरकत शुल्कही परत करण्याचे सुचविण्यात आले आहे.
उमेदवारांची आधार किंवा महाआयडीच्या माध्यमातून एकदाच नोंदणी करण्याची व्यवस्था, परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक आधीच जाहीर करणे आणि रिक्त पदांच्या भरतीसाठी विभागांनी वेळेत मागणीपत्र सादर करणे, अशा सुधारणांचाही अहवालात समावेश आहे.
हिवाळी अधिवेशनात कायद्यात बदल होणार?
सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली 4 सप्टेंबर 2026 रोजी सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी पहिला अहवाल सादर केला होता. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी दुसरा अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आला.
आता या शिफारशींच्या आधारे महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंधक) अधिनियम, 2024 मध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक आणण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याची माहिती आहे. 7 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
