नाशिक. Samruddhi Mahamarg news: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर वाहनांना लक्ष्य करून लुटमारीच्या घटना समोर आल्यानंतर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिन्नर परिसरात वाहनांचे टायर पंक्चर करून प्रवाशांना लुटल्याच्या घटनांनंतर आता महामार्गावर अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या अंतर्गत सिन्नर ते इगतपुरीदरम्यान CCTV कॅमेऱ्यांसाठी गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.
दरोडेखोरांकडून वाहनांना लक्ष्य
समृद्धी महामार्गावरील सिन्नर परिसरात 27 ऑगस्टच्या मध्यरात्री काही कुटुंबांना लुटल्याची घटना समोर आली होती.माहितीनुसार, दरोडेखोरांच्या टोळीने वाहनांचे टायर पंक्चर करून वाहनचालकांना थांबण्यास भाग पाडले आणि त्यानंतर प्रवाशांना धमकावत लाखो रुपयांचा ऐवज लुटला. या घटनांमुळे रात्रीच्या वेळी समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर महामार्गावर CCTV आणि तंत्रज्ञानाधारित निगराणी व्यवस्था मजबूत करण्याला प्रयत्न केले आहे. ITMS अंतर्गत बसवण्यात येणाऱ्या गॅन्ट्रीवर CCTV कॅमेरे आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक उपकरणे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहनांची हालचाल अधिक प्रभावीपणे नियंत्रित आणि मॉनिटर करता येणार आहे.
31 ऑगस्टपासून पहिला टप्पा-
ITMS अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे.
पहिला टप्पा – सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंज
* 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर
* मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक : दुपारी 12 ते 1
* नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक : दुपारी 3 ते 4
या कालावधीत संबंधित दिशेची वाहतूक तासभर पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात भरवीर-इगतपुरी मार्गावर ब्लॉक
यानंतर भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज या टप्प्यात गॅन्ट्री बसवण्याचे काम करण्यात येईल.
दुसरा टप्पा –
* 4 सप्टेंबर
* 5 सप्टेंबर
* 7 सप्टेंबर
या दिवशीही मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी दुपारी 12 ते 1 आणि नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी दुपारी 3 ते 4 या वेळेत वाहतूक बंद ठेवली जाईल. 6 सप्टेंबरला वाहतूक ब्लॉक नाही.
प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे
या कामासाठी महामार्ग पोलिसांची परवानगी घेण्यात आली आहे. गॅन्ट्री बसवताना मोठ्या क्रेन आणि यंत्रसामग्रीचा वापर होणार असल्याने वाहनांची वाहतूक थांबवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या काळात समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी ब्लॉकच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ITMSमुळे काय फायदा होणार?
इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे महामार्गावरील वाहतुकीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांची हालचाल, वाहतूक कोंडी, अपघात तसेच संभाव्य धोकादायक परिस्थितीवर अधिक वेगाने लक्ष देता येईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि इतर घटनांवरही देखरेख ठेवण्यास या यंत्रणेची मदत होऊ शकते.
सिन्नर-इगतपुरी पट्ट्यात लुटमारीच्या घटना समोर आल्यानंतर CCTV नेटवर्क मजबूत होणे महत्त्वाचे मानले जात आहे. महामार्गावरील संवेदनशील ठिकाणांवर सतत नजर ठेवता आल्यास गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यास तसेच घटना घडल्यानंतर आरोपींचा माग काढण्यास मदत होऊ शकते.
दरम्यान, 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत ब्लॉक असला तरी तो संपूर्ण दिवस नसून नियोजित वेळेत आणि विशिष्ट टप्प्यावरच असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी दुपारी 12 ते 1 आणि 3 ते 4 या वेळेतील प्रवास शक्यतो टाळून त्यानुसार नियोजन करावे.
