जेएनएन, नागपूर: दिवाळीचा सण म्हटलं की फराळाची लगबग सुरू होते. चिवडा, लाडू, करंजी आणि चकलीशिवाय दिवाळीचा फराळ अपूर्णच वाटतो. विशेषतः खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग चकली खायला सर्वांनाच आवडते. यंदा दिवाळीत बाजारातून चकली आणण्याऐवजी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी चकली बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चकली बनवण्याची सोपी रेसिपी.


चकलीची भाजणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • तांदूळ – 4 वाट्या
  • चणाडाळ – 2 वाट्या
  • उडीद डाळ – 1 वाटी
  • मूग डाळ – अर्धी वाटी
  • पोहे – अर्धी वाटी
  • साबुदाणा – पाव वाटी
  • धणे – 2 चमचे
  • जिरे – 1 चमचा

भाजणी तयार करण्याची कृती:

  • सर्व डाळी, तांदूळ आणि इतर साहित्य वेगवेगळे स्वच्छ करून घ्या.
  • कढईत मंद आचेवर प्रत्येक पदार्थ स्वतंत्रपणे खमंग भाजून घ्या.
  • सर्व भाजलेले साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • त्यानंतर मिक्सर किंवा गिरणीतून बारीक दळून घ्या.

चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 2 वाट्या भाजणीचे पीठ
  • 1 चमचा तीळ
  • अर्धा चमचा ओवा
  • 1 चमचा लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • अर्धा चमचा हळद
  • 2 चमचे गरम तेल किंवा तूप
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तळण्यासाठी तेल

चकली बनवण्याची कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात चकलीची भाजणी घ्या. त्यामध्ये तीळ, ओवा, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा.
  • त्यानंतर मिश्रणात गरम तेल किंवा तूप घालून चमच्याने चांगले मिसळा.
  • आता थोडेथोडे पाणी घालून मऊसर आणि घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ खूप सैल किंवा खूप कडक ठेवू नका.
  • तयार पीठ 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा.
  • चकलीच्या साच्याला थोडे तेल लावा आणि त्यात पीठ भरा.
  • एका ताटात किंवा प्लास्टिक शीटवर गोलाकार चकल्या पाडून घ्या.
  • कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर चकल्या सावकाश सोडा.
  • चकल्या मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तयार चकल्या टिश्यू पेपरवर काढून थंड होऊ द्या.

खुसखुशीत चकली बनवण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स

  • पीठ मळताना पाणी एकदम न घालता थोडेथोडे घाला.
  • चकलीचे पीठ योग्य प्रमाणात मऊसर असावे.
  • तेल खूप गरम असल्यास चकल्या बाहेरून पटकन लाल होतात आणि आतून कच्च्या राहू शकतात.
  • चकल्या नेहमी मध्यम आचेवर तळाव्यात.
  • चकल्या पूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.

अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत चकल्या तयार होतील. यंदाच्या दिवाळीत पाहुण्यांना आणि कुटुंबीयांना घरच्या हाताने बनवलेल्या चकलीचा आस्वाद नक्की द्या.

हेही वाचा: Puran Poli Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा खमंग पुरणपोळी; जाणून घ्या सोपी रेसिपी