जेएनएन, मुंबई. Shivrajyabhishek Din 2024: आईने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी बालपणीच शपथ घेतली आणि फक्त शपथ घेऊनच थांबले नाही तर ती पूर्ण करण्यासाठी जीवाचे करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आजच्या दिवशी म्हणजेच 6 जून 1674 साली पार पडला होता. आणि त्या दिवशी स्वराज्याला त्याचा राजा मिळाला. राष्ट्राची मुघलांच्या जाचातून सुटका करून देण्यासाठी महाराजानी स्वराज्याच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. त्यांचा राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला रायगडावर पार पडला. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या या शुभ प्रसंगी जाणून घेऊया शिव राज्याभिषेक सोहळ्याशी संबंधित काही महत्वाच्या बाबी...

शिवराज्यभिषेक सोहळ्याचा विधी
6 जून 1674 शिवराज्यभिषेक सोहळ्याचा विधी पार पडला गेला या दिवशी पहाटे मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर महाराजांनी आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेकाच्या विधीला सुरवात केली. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना याप्रसंगी विविध आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले तसेच त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकासाठी महाराज दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर बसले होते. त्यांच्या शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेल्या सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे त्यांच्याच रांगेत थोडे मागे बसले होते. राज्याभिषेकासाठी अष्टप्रधानांतील आठ प्रधानांनी गंगेसारख्या पवित्र विविध नद्यांतून पाणी आणले होते. या पवित्र नद्यांच्या पाण्याने छत्रपती शिवाजीमहाराजांवर मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्यांच्या आवाजात अभिषेक करण्यात आला. सोळा सुवासिनींनी महाराजांची पंचारती ओवाळली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली व मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

छत्रपती शिवाजी महाराज  सिंहासनावर आरुढ
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकुन चिन्हांनी सजवलेले होते असे सांगितले जाते की, 32 मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. यावेळी ’शिवराज की जय’, 'शिवराज की जय’च्या घोषणा रायगडावर ऐकू येत होत्या. सोन्याचांदीची फुले उधळली गेली  प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जनांना एकूण सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. या समारंभानंतर छत्रपती शिवाजी महाराज जगदीश्वराच्या मंदिराकडे तेथे आशीर्वाद घेतल्यानंतर हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर काढण्यात आली. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

देवदर्शन व तुला
राज्याभिषेक सोहळ्याआधी महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन व पूजा केली. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणे शक्य न झाल्याने त्यांनी प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमातेचे दर्शन घेतले. यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी महाराजांचा त्यांच्या दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला गेला. या प्रसंगी मुख्य पुरोहित गागाभट्टांना 7000 होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून 17000 होन दक्षिणा दिली गेली. राज्याभिषेका आधी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला करण्यात आली.  तसेच  वस्त्र , धान्य, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींनी देखील तुला करण्यात आली.

शिव राज्याभिषेक सोहळ्यात उपस्थित अतिथी मान्यवर
शिवराज्यभिषेकासाठी सोहळ्यासाठी देशभरातून अतिथी मान्यवर उपस्थित झाले होते. देशाच्या कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. देशभरातील सन्माननीय व्यक्ती मिळून जवळपास लाखभर लोक शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जमा झाले होते. या सर्व मान्यवरांची चार महिन्यांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था रायगडावर  करण्यात आली होती. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता अश्या सर्वांना या खास दिनासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते.