डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. PM Modi China Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला जपानचा दोन दिवसीय दौरा पूर्ण केला आहे. यानंतर ते एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान आणि चीन दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा ट्रम्प यांनी चीन आणि भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडला आहे. मोठ्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरू शकतो, असे मानले जात आहे.

एससीओ शिखर परिषदेत होणार सहभागी

31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी चीनच्या तियानजिन शहरात आयोजित होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी चीनमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सुमारे 7 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत.

ट्रम्प यांच्या टॅरिफला तोडगा ठरणार हा दौरा?

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला असला तरी, त्यांच्या या निर्णयाबद्दल अनेक अमेरिकी दिग्गजांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड वूल्फ यांनी इशारा दिला आहे की, ट्रम्प यांचा हा निर्णय चुकीचा ठरेल. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, जागतिक आर्थिक व्यवस्थेत मोठा बदल होत आहे आणि अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवणे हे दर्शवते की, शक्तीचे संतुलन आता अमेरिकेकडून ब्रिक्स देशांकडे झुकत आहे.

    भारताशी संबंध सुधारण्यासाठी चीन आतुर

    'ब्लूमबर्ग'च्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, जेव्हा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत व्यापार युद्ध सुरू केले होते, तेव्हाच चीन भारतासोबत शांततापूर्ण मार्गाने आपले संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात लागला होता.

    असे मानले जात आहे की, या शिखर परिषदेदरम्यान एससीओचे सर्व देश एका संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करू शकतात, ज्यात अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला सडेतोड उत्तर दिले जाऊ शकते.