एजन्सी, बँकॉक: म्यानमारच्या मध्यवर्ती सागाईंग प्रदेशातील एका बौद्ध मठावर शुक्रवारी झालेल्या लष्करी हवाई हल्ल्यात, आठवडाभर चालणाऱ्या ध्यान शिबिरात सहभागी झालेल्या 14 जणांचा मृत्यू झाला.
देशातील लोकशाही समर्थक शक्ती आणि लष्करविरोधी सशस्त्र गटांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांच्या मालिकेतील हा नवीनतम हल्ला आहे. एका गावकऱ्याने सांगितले की, लढाऊ विमानांनी 15 मिनिटांच्या अंतराने दोन बॉम्ब टाकले. मात्र, लष्कराने या हल्ल्यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
तीन महिलांसह 14 जणांचा मृत्यू
देशातील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या मंडालेच्या पश्चिमेला सुमारे 75 किमी अंतरावर असलेल्या म्याउंग टाउनशिपमधील स्वेल ले ओह गावात शुक्रवारी सकाळी 9 वाजता हा हल्ला झाला, अशी माहिती म्याउंग टाउनशिपच्या नागरी संरक्षण आणि सुरक्षा संघटनेचे (सीडीएसओएम) प्रवक्ते न्वे ऊ यांनी दिली.
न्वे ऊ यांनी सांगितले की, एका लढाऊ विमानाने गावातील मठाच्या आवारात बॉम्ब टाकल्याने तीन महिलांसह 14 जण ठार झाले आणि 20 जण जखमी झाले.
नाव न सांगण्याच्या अटीवर बोलणाऱ्या एका ग्रामस्थानेही मृतांच्या या संख्येला 'द असोसिएटेड प्रेस' (AP) कडे दुजोरा दिला.
फेब्रुवारी 2021 मध्ये लष्कराने आंग सान सू की यांच्या निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता हस्तगत केल्यापासून म्यानमारमध्ये अशांतता आहे.
शांततापूर्ण निदर्शने बळाने दडपल्यानंतर लष्करी राजवटीच्या अनेक विरोधकांनी शस्त्रे उचलली असून, देशाचा मोठा भाग लढाईने पेटला आहे.
सशस्त्र पीपल्स डिफेन्स फोर्ससह विरोधी दलांना प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कर सागाईंग परिसरात हवाई हल्ले करत आहे. सागाईंग हा सशस्त्र विरोधी दलांचा बालेकिल्ला आहे. या हवाई हल्ल्यांविरुद्ध विरोधी दलांकडे कोणताही प्रभावी बचाव नाही.
