पीटीआय, इस्लामाबाद. Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या कठोर पावलांमुळे खच्ची झालेल्या पाकिस्तानने पुन्हा डरकाळी दिली आहे.
भारताने सिंधू जल करार थांबवला
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे की, जर सिंधू जल कराराचे उल्लंघन करून सिंधू नदीवर कोणतेही बांधकाम केले गेले, तर पाकिस्तान त्यावर हल्ला करून ते उद्ध्वस्त करेल. पाक समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार थांबवला होता.
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले हे वाक्य
जिओ न्यूजच्या एका मुलाखतीत आसिफ म्हणाले- "जर त्यांनी सिंधू नदीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यावर हल्ला करू."
ते पुढे म्हणाले की, सिंधू नदीवर कोणतेही बांधकाम करणे हे पाकिस्तानविरुद्ध भारतीय आक्रमकता मानले जाईल.
सिंधूवर धरण लोकांसाठी ठरेल त्रासदायक
आसिफ म्हणाले की, आक्रमकता केवळ तोफा किंवा गोळ्यांनीच नसते, तर तिची अनेक रूपे असतात, जसे की पाणी थांबवणे किंवा वळवणे. यामुळे तहानने मृत्यू होऊ शकतात. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान हे प्रकरण पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या मंचांचा वापर करेल.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला प्रत्युत्तराचा अधिकार
तसे पाहिले तर दक्षिण आशियात कोणालाही युद्ध नको आहे, पण पाकिस्तानपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार भारताला आहे. त्यामुळे 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये धर्म विचारून मारल्या गेलेल्या 28 पर्यटकांच्या प्रकरणात भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.
हे विधान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले जॉन बोल्टन यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
बोल्टन म्हणाले की, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन मिळू नये आणि त्यात सहभागी असलेल्यांना अटक करून शिक्षा दिली जावी. याबाबत अमेरिकेचे धोरण स्पष्ट आहे. दुर्दैवाने पाकिस्तान सरकार अशा कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर नियंत्रण ठेवत नाही. आतापर्यंतच्या तपासात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांपैकी दोन पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे.
अरबी समुद्राच्या काही विशिष्ट भागांपासून व्यापारी जहाजांना दूर राहण्यास सांगितले
भारताच्या सागरी अधिकाऱ्यांनी अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या सरावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी जहाजांना सावधगिरी बाळगण्यासाठी नौवहन अलर्ट जारी केला आहे. त्यांना काही विशिष्ट भागांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी ही माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.