पीटीआय, लाहोर. Pakistan Train Derailed: पाकिस्तानमधील लाहोरजवळ एका ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. या घटनेत 30 प्रवासी जखमी झाले आहेत. याची माहिती शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तान रेल्वेच्या माहितीनुसार, लाहोरहून रावळपिंडीला जाणारी इस्लामाबाद एक्सप्रेस शुक्रवारी सायंकाळी लाहोरपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेखूपुरा येथील काला शाह काकू येथे रुळावरून घसरली.

डब्यांमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत

रेल्वेने शुक्रवारी रात्री उशिरा एका निवेदनात म्हटले की, शेखूपुरा येथे ट्रेनचे किमान 10 डबे रुळावरून घसरले, ज्यामुळे सुमारे 30 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या मते, डब्यांमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रेल्वेने सांगितले की, अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. लाहोर रेल्वे स्थानकातून निघाल्यानंतर अर्ध्या तासातच ट्रेनचे डबे रुळावरून घसरले, असेही त्यांनी पुढे सांगितले.

पाक रेल्वेमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

रेल्वे मंत्री मुहम्मद हनीफ अब्बासी यांनी या दुर्घटनेची दखल घेतली आणि रेल्वेचे सीईओ व विभागीय अधीक्षकांना घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करून सात दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले.