जेएनएन, मुंबई: अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला आणि तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित 'ईठा' हा आगामी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावर आणि कथानकाच्या सादरीकरणावर विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप नोंदवत निर्मात्यांकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
विठाबाईंचे सुपुत्र कैलास नारायणगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, चित्रपटाबाबत त्यांना फार उशिरा माहिती मिळाली. टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही प्रसंगांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, विठाबाईंच्या संघर्षमय जीवनावर चित्रपट तयार होणे ही अभिमानाची बाब असली, तरी त्यापूर्वी कुटुंबीयांशी चर्चा होणे आवश्यक होते. तसेच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कुटुंबीयांना दाखवण्यात यावा, जेणेकरून कोणतेही आक्षेपार्ह किंवा वस्तुस्थितीशी विसंगत चित्रण असल्यास त्यावर सूचना करता येतील, अशी मागणी त्यांनी केली आहे.
'ईठा' ऐवजी 'विठा'
चित्रपटाच्या नावावरही कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर यांनी सांगितले की, चित्रपटाचे शीर्षक 'ईठा' ऐवजी 'विठा' किंवा 'विठाबाई' असावे. तसेच शीर्षकामध्ये 'नारायणगावकर' हे आडनावही समाविष्ट करून त्यांच्या संपूर्ण नावाचा सन्मान राखावा. या संदर्भात निर्मात्यांना ई-मेलद्वारे सूचना पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागानेही चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत, विठाबाईंच्या योगदानाला न्याय देणारे नाव ठेवण्याची मागणी केली आहे. या भूमिकेला नारायणगावकर कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला आहे.
या संपूर्ण वादावर अद्याप चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर किंवा निर्माते दिनेश विजान यांच्या निर्मिती संस्थेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे निर्माते कुटुंबीयांच्या मागण्या मान्य करणार का, याकडे आता चित्रपटसृष्टीसह लोककला रसिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: 'दर्याभवानी'मधून पुन्हा उलगडणार शिवकालीन इतिहास; दिग्पाल लांजेकरांच्या नव्या चित्रपटाची घोषणा
