जेएनएन, मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या बहुचर्चित 'श्री शिवराय अष्टक' मालिकेतील सातव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'दर्याभवानी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

पोस्टरमध्ये उफाळलेल्या समुद्रात धावणारे भव्य जहाज, त्यावर दिमाखात फडकणारा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह त्यांच्या मावळ्यांची झलक पाहायला मिळते. या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

दिग्पाल लांजेकर यांचा 'दर्याभवानी' हा चित्रपट सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमार उभारणीवर आधारित आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी धोरण, आरमाराची उभारणी आणि मराठा साम्राज्याच्या सागरी इतिहासाची माहिती प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.

या दिवशी प्रदर्शित होईल चित्रपट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'श्री शिवराय अष्टक' या मालिकेतील आठ चित्रपटांची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. त्यापैकी सहा चित्रपट प्रदर्शित झाले असून, आता सातवा चित्रपट 'दर्याभवानी' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट १५ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिगपाल लांजेकर यांनी केले असून, निर्मिती श्री तिरुपती बालाजी यांची आहे. तर पुष्कर यावलकर हे सहनिर्माते आहेत.

चित्रपटात झळकणार हे कलाकार
चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, ऋषी सक्सेना, आस्ताद काळे, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, नितीन वाघ, सचिन देशपांडे यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत झळकणार आहेत. चित्रपटाचे लेखन दिगपाल लांजेकर यांनी केले असून, सहलेखनाची जबाबदारी नितीन वाघ आणि मेघना गुंजाळ यांनी सांभाळली आहे.

श्री शिवराय अष्टक मालिका
दिग्पाल लांजेकर यांच्या 'श्री शिवराय अष्टक' मालिकेतील आतापर्यंत 'फर्जंद' (2018), 'फत्तेशिकस्त' (2019), 'पावनखिंड' (2022), 'शेर शिवराज' (2022), 'सुभेदार' (2023) आणि 'शिवरायांचा छावा' (2024) हे सहा चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता सातव्या चित्रपट 'दर्याभवानी'च्या घोषणेनंतर शिवप्रेमी आणि चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Raja Shivaji OTT Release: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट आता ओटीटीवर, जाणून घ्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख