जेएनएन, मुंबई: मराठी अभिनेता वैभव मांगले यांनी बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांबाबत केलेली एक फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळालं म्हणजेच कलाकार मोठा ठरतो, या मानसिकतेवर त्यांनी थेट निशाणा साधला आहे.
वैभव मांगले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “मराठी कलाकार हिंदीत चमकले म्हणजेच ते भारी कलाकार ठरतात, हे फालतू कौतुक बंद झालं पाहिजे.” मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात, त्यामुळे हिंदी इंडस्ट्रीत नाव कमावणं हेच यशाचं मोजमाप असू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी कलाकारांना फारसं महत्त्व दिलं जात नाही, असा आरोपही त्यांनी केला. “माधुरी आणि नाना सोडले तर मराठी कलाकारांना तिथे फारशी किंमत मिळाली नाही,” असं म्हणत त्यांनी हिंदी इंडस्ट्रीवर नाराजी व्यक्त केली.
पोस्टमध्ये त्यांनी प्रशांत दामले, उमेश कामत, प्रिया बापट, भरत जाधव, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक आणि स्पृहा जोशी यांसारख्या कलाकारांचा उल्लेख करत, हे कलाकार मराठी इंडस्ट्रीतील अत्यंत मोठी आणि महत्त्वाची नावं असल्याचं सांगितलं.

“मला कधीही हिंदी इंडस्ट्रीचं आकर्षण वाटलं नाही. तिथे काम केलं तरच आपण मोठे होतो, असं मला कधीच वाटलं नाही,” असंही त्यांनी पोस्टच्या शेवटी नमूद केलं.
वैभव मांगले यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी त्यांच्या मताला समर्थन दिलं असून मराठी कलाकारांच्या प्रतिभेला योग्य मान्यता मिळायला हवी, असं म्हटलं आहे. तर काहींनी हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीची तुलना करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा: Deool Band 2 Box Office Collection: देऊळ बंद 2 ची पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, कमावले इतके कोटी...
