जेएनएन, मुंबई: पुणे जिल्ह्यतील माळीण गावावर झालेली 2014 मधील माळीण भूस्खलन दुर्घटनेवर आधारित 'एक होतं माळीण' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. वास्तव घटनेला भावनिक आणि प्रभावी सिनेमॅटिक रूप देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन दत्तात्रेय (दत्तू) आणि राजू राणे यांनी केले असून, कथा, संकल्पना आणि पटकथा राजू राणे यांनी साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती अक्षय म्हात्रे यांनी केली असून, ड्रीम डॉट क्रिएशनच्या रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्तू आणि राजू राणे यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. RRAN Studiosच्या बॅनरखाली नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे, अक्षय म्हात्रे आणि राजू राणे यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
चित्रपटातील कलाकार
या चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजीत श्वेतचंद्र, रामचंद्र धुमाळ, अनिल नगरकर, सिद्धी पाटणे, अक्षय म्हात्रे, प्रशांत तापसवी, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ट्रेलरमध्ये कलाकारांच्या नैसर्गिक अभिनयाची झलक पाहायला मिळते.
चित्रपटात अजय-अतुल, जावेद अली, आनंदी जोशी, हरिदास शिंदे आणि पियुष भिरूड यांनी गाणी सादर केली असून, संगीत आणि भावपूर्ण गीतांमुळे चित्रपटाचा प्रभाव अधिक गडद होण्याची अपेक्षा आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित?
ट्रेलरमध्ये एका क्षणात उद्ध्वस्त झालेल्या गावाची वेदना, संकटातही न हार मानणाऱ्या माणसांचा संघर्ष आणि आशेची नवी किरण यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. वास्तवदर्शी दृश्ये, हृदयस्पर्शी संवाद आणि भावनिक मांडणीमुळे 'एक होतं माळीण' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे. वास्तव घटनेवर आधारित हा चित्रपट 26 जुलै 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ट्रेलरनंतर मराठी चित्रपटप्रेमींमध्ये त्याची उत्सुकता अधिक वाढली आहे.
हेही वाचा: मराठी रंगभूमीवरील एका युगाचा अंत! 'बाई' ज्येष्ठ दिग्दर्शिका - अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन
