जेएनएन, मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नव्या रोमँटिक कहाणीची चाहूल देणारा ‘असा मी अशी मी’ या चित्रपटाचा टिझर आज प्रदर्शित झाला. अभिनेता अजिंक्य देव आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या जोडीची झलक या टिझरमध्ये पाहायला मिळत असून, दोन परस्परविरोधी स्वभावांच्या व्यक्तींमध्ये उमलणाऱ्या नात्याची कथा यामध्ये दिसून येते.
प्रदर्शित झालेल्या टिझरमध्ये नायकाचा बंडखोर, मोकळा आणि ‘कॅसानोव्हा’ स्वभाव अधोरेखित करण्यात आला आहे. तर त्याच्या अगदी उलट—साधी, शांत, मनमोकळी आणि निरागस अशी नायिका दाखवली आहे. त्यांची अनपेक्षित भेट, त्यांच्यात वाढणारा संवाद आणि हळूहळू जन्म घेणारी प्रेमाची भावना टिझरमध्ये हलक्या स्वरूपात उलगडताना दिसते. या विरुद्ध स्वभावांच्या दोन व्यक्तींची प्रेमकहाणी प्रेक्षकांना कुठे घेऊन जाणार, याची उत्सुकता टिझर वाढवतो. हा चित्रपटाचा 28 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात अजिंक्य देव आणि तेजश्री प्रधान या मुख्य कलाकारांसोबत माधव देवचाके, संजय मोने, कृष्णकांत, यशश्री मसुरकर यांच्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत. या चित्रपटाचे निर्माते सचिन नाहर आणि आनिश, तर सह-निर्माते अमोग मालवीया आणि सुरेश पाई आहेत. असोसिएट प्रोड्यूसर म्हणून आशा नाहर यांची साथ मिळाली आहे. दिग्दर्शक अमोल शेटगे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. निलेश मोहरिर यांचे संगीत आणि आदित्य बेडेकर यांनी दिलेले पार्श्वसंगीत चित्रपटाची भावनिकता अधिक ठळक करतात.
Maxamus Ltd, Atlas Movie Time, आणि Text Step Services यांच्या प्रस्तुतीने ‘असा मी अशी मी’ मोठ्या पडद्यावर येत आहे. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबद्दलची चर्चा सोशल मीडियावर वाढली असून, प्रेक्षक आता 28 नोव्हेंबर 2025 रोजी संपूर्ण प्रेमकथा अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत.
हेही वाचा: क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा प्रवास दाखवणारी नवी मालिका; अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुळकर पुन्हा एकत्र
