जेएनएन, मुंबई : मराठी मनोरंजन विश्वासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेते अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हे दोघेही आता एका महत्वाकांक्षी ऐतिहासिक मालिकेत एकत्र झळकणार आहेत. ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या नव्या मालिकेद्वारे हे दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या मालिकेची अधिकृत घोषणा चॅनेल आणि निर्मिती संस्थेकडून करण्यात आली आहे.

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित आहे. बालविवाह, जातीय विषमता, महिलांवरील अन्याय आणि निरक्षरता दूर करण्यासाठी सावित्रीबाईंनी केलेल्या संघर्षमय वाटचालीचे दर्शन मालिका घडवणार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांचे योगदान देखील मालिका सखोलपणे मांडणार आहे. ही मालिका 5 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे बोलले जात आहे. 

अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुळकर – दमदार जोडीची पुनरागमन
अमोल कोल्हे हे ऐतिहासिक व चरित्रप्रधान भूमिकांसाठी ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांसारख्या भूमिका त्यांनी प्रभावीपणे रंगवल्या आहेत. त्यामुळे ‘ज्योतिबा फुले’ ही भूमिका ते कशी साकारतील याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मधुराणी प्रभुळकर यांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली. सावित्रीबाईंची भावनिक, बळकट आणि संघर्षशील व्यक्तिरेखा त्यांनी कशी साकारली असेल, याची चर्चा आधीच सुरू आहे.

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेची घोषणा झाल्यांनतर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, उंबरठ्याबाहेर पाऊल टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेणाऱ्या प्रत्येक महिलेची प्रेरणा म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत कथा, कलाकार आणि निर्माता म्हणून योगदान देणं हे कलावंत म्हणून माझ्यासाठी भाग्याचं तर आहेच, पण त्याहूनही अधिक माणूस म्हणून मला समृद्ध, सजग आणि संवेदनशील बनवणारं आहे. इतिहास घडवणाऱ्या विचारांना आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही संधी आयुष्यभर लक्षात राहील. स्टार प्रवाह वाहिनी परिवाराचे मनःपूर्वक आभार

https://x.com/supriya_sule/status/1990756744809918955

सुप्रिया यांचे ट्विट 
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील  सोशल मीडियावर पोस्ट करत कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु होत आहे. या मालिकेत खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. डॉ कोल्हे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. या मालिकेसाठी त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा. एक चांगली मालिका रसिकांच्या भेटीस आणत असल्याबद्दल धन्यवाद...!