जेएनएन, मुंबई: महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले मराठी संगीत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. ‘माझ्या सोन्या’ या गाण्यामुळे लोकप्रिय झालेला मराठमोळा रॅपर स्वॅगर बॉय (SWAGER BOY) आणि मेक्सिकोचा इलेक्ट्रॉनिक संगीत कलाकार फ्रीबोट (FREEBOT) यांचे ‘नाच ना’ हे नवे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मराठी, हिंदी आणि स्पॅनिश या तीन भाषांचा संगम, इलेक्ट्रॉनिक संगीताचा ठेका आणि महाराष्ट्राच्या टेक ट्रायबल संगीतशैलीचा प्रभाव यामुळे हे गाणे विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘वर्ल्ड ऑफ वाईब्स’ रेकॉर्ड लेबलच्या माध्यमातून साकारलेल्या या आंतरराष्ट्रीय संगीत सहकार्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
निर्माता-दिग्दर्शक रॉक कच्ची यांनी या गाण्याची निर्मिती केली असून, ते ‘वर्ल्ड ऑफ वाईब्स’ या संगीत लेबलचे संस्थापक आहेत. गाण्याचे दिग्दर्शन झाहिद सय्यद यांनी केले आहे. अभिनेत्री एकता, अभिनेता रॉक कच्ची आणि रॅपर स्वॅगर बॉय हे कलाकार या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकले आहेत. पुण्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
फ्रीबोटच्या भारत दौऱ्यातून आकाराला आली ‘नाच ना’ची संकल्पना
‘नाच ना’ या गाण्याची संकल्पना फ्रीबोट यांच्या भारत दौऱ्यादरम्यान आकाराला आली. ‘वर्ल्ड ऑफ वाईब्स’च्या माध्यमातून सुरू झालेल्या या संगीतप्रवासात महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या टेक ट्रायबल संगीतशैलीवर आधारित काहीतरी वेगळे करण्याचा विचार पुढे आला. या संगीतशैलीच्या ठेक्यावर स्वॅगर बॉयची रॅप करण्याची शैली प्रभावी ठरेल, असा विश्वास रॉक कच्ची यांना वाटला. त्यानंतर अवघ्या एक-दोन दिवसांत स्वॅगर बॉयने गाणे तयार केले.
या गाण्यासाठी काही मोठ्या म्युझिक लेबल्सकडूनही रस दाखवण्यात आला होता. मात्र, गाण्याची बीट बदलून ते हिंदी भाषेत सादर करण्याच्या सूचना आल्याने ‘वर्ल्ड ऑफ वाईब्स’ने गाण्याची मराठी ओळख कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. निर्मितीदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला, तसेच प्रायोजकांकडूनही नकार मिळाले. अखेर रॉक कच्ची आणि त्यांच्या टीमने स्वतःची गुंतवणूक करून गाण्याची निर्मिती आणि म्युझिक व्हिडिओ पूर्ण केला.
या प्रकल्पात रॉक कच्ची यांनी सहनिर्माता, लेखक आणि सहदिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले आहे. तर झाहिद सय्यद यांनी दिग्दर्शनासोबतच सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली. यापूर्वी स्वॅगर बॉय आणि वाय डी यांच्या ‘माझ्या सोन्या’ या गाण्याच्या व्हिडिओसाठीही झाहिद सय्यद यांनी काम केले होते.
‘नाच ना’ म्हणजे मराठी संगीताला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न
या गाण्याविषयी बोलताना निर्माता-दिग्दर्शक रॉक कच्ची म्हणाले, “‘तांबडी चांबडी’ या गाण्यानंतर आता मी रॅपर स्वॅगर बॉय आणि मेक्सिकन कलाकार फ्रीबोट यांना घेऊन ‘नाच ना’ हे गाणे तयार केले आहे. ‘नाच ना’ हे केवळ एक गाणे नसून महाराष्ट्राच्या प्रादेशिक संगीताला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वॅगर बॉयचे संगीत, गीतलेखन आणि गायन यांसोबतच फ्रीबोट यांच्या मेक्सिकन इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव या गाण्यात अनुभवायला मिळतो.”
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या सांगीतिक संस्कृतीला आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक संगीतविश्वाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी भाषा आणि स्थानिक संगीताचा अभिमान जपत जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश या गाण्यातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘नाच ना’ला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत पोहोचणारा हा सांगीतिक प्रवास मराठी संगीतासाठी नव्या आंतरराष्ट्रीय अध्यायाची सुरुवात ठरेल, अशी अपेक्षा आहे.”
‘नाच ना’ माझ्यासाठी स्वप्नवत प्रकल्प : स्वॅगर बॉय
‘माझ्या सोन्या’ या गाण्याला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर स्वॅगर बॉय आता ‘नाच ना’ या नव्या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे. या गाण्याच्या निर्मितीप्रक्रियेविषयी सांगताना तो म्हणाला, “‘माझ्या सोन्या’ या गाण्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात. आता तुमच्यासाठी महाराष्ट्रीयन आणि मेक्सिकन शैलीचा संगम असलेले हे मराठी गाणे घेऊन आलो आहे. या गाण्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी रॉक दादाचे मनापासून आभार मानतो.”
तो पुढे म्हणाला, “मेक्सिकन कलाकार फ्रीबोट भारतात आले असताना रॉक दादाने त्यांच्यासोबत गाणे करण्याची कल्पना मांडली आणि फ्रीबोट यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून ‘नाच ना’ची निर्मिती झाली. पुण्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. माझ्यासाठी हा प्रकल्प स्वप्नवत आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून, माझ्या सर्व गाण्यांना प्रेक्षकांचे असेच प्रेम मिळावे, अशी अपेक्षा आहे. ‘नाच ना’वर छान छान रील्स तयार करा आणि आम्हाला टॅग करायला विसरू नका.”
मराठी संगीताच्या आंतरराष्ट्रीय प्रवासातील नवी भर
महाराष्ट्राची स्थानिक संगीतशैली आणि मेक्सिकोतील इलेक्ट्रॉनिक संगीत यांची सांगड घालणारे ‘नाच ना’ हे गाणे प्रादेशिक संगीताला जागतिक स्तरावर नेण्याच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा प्रयोग ठरत आहे. भाषेच्या आणि देशाच्या सीमा ओलांडत संगीताच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या संस्कृतींना जोडण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. ‘वर्ल्ड ऑफ वाईब्स’च्या या उपक्रमामुळे मराठी संगीताला आंतरराष्ट्रीय श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
हेही वाचा: पाकिस्तानातील पेशावर फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘धाराऊ’चा डंका; ‘बेस्ट डेब्यू फीचर फिल्म’ पुरस्काराने गौरव
