जेएनएन, मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील संस्कृती, गोमातेप्रती श्रद्धा आणि एका लहान मुलाचे गायीशी असलेले भावनिक नाते उलगडणाऱ्या आगामी मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा अधिकृत टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!’ या लक्षवेधी टॅगलाइनमुळे चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांच्या माहितीनुसार, या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल २६ पुरस्कार मिळाले असून, पाकिस्तानातील पेशावर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट डेब्यू फीचर फिल्म’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
चित्रपटाच्या टीझरमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनशैली, भारतीय संस्कृती, धार्मिक श्रद्धा आणि गायीशी जोडलेले भावनिक नाते यांची झलक पाहायला मिळते. एका लहान मुलाचे आणि गायीचे जिव्हाळ्याचे नाते हा चित्रपटाचा केंद्रबिंदू असल्याचे टीझरवरून जाणवते. ग्रामीण परिसर, धार्मिक स्थळांची पार्श्वभूमी आणि बालपणातील भावविश्व यांमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाला जगभरातून 26 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार
चित्रपटाचे दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांनी या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “माझ्या पहिल्याच मराठी चित्रपटाला जगभरातून २६ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. प्रत्येक जण आपल्या परीने गोमातेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी प्रयत्न करत असतो. कुणी गोशाळा उभारून गोपालन करतो, तर कुणी विविध माध्यमांतून जनजागृती करतो. मी चित्रपटाच्या माध्यमातून माझे योगदान देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.”
‘बेस्ट डेब्यू फीचर फिल्म’ पुरस्कार
ते पुढे म्हणाले, “हिंदू धर्मात गायीला मातेचे स्थान का दिले जाते आणि ती पूजनीय का मानली जाते, यामागील भावना व विचार ‘धाराऊ’च्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. पाकिस्तानातील पेशावर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाला ‘बेस्ट डेब्यू फीचर फिल्म’ पुरस्कार मिळणे, ही माझ्यासाठी विशेष अभिमानाची गोष्ट आहे. चित्रपटामागील भावना आणि विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, अशी आशा आहे.”
‘धाराऊ’ या चित्रपटातून गोमातेप्रती असलेली श्रद्धा, माणुसकी, ग्रामीण संस्कृती आणि भावनिक नातेसंबंध यांचा वेध घेण्यात आला आहे. केवळ धार्मिक भावनांपुरता मर्यादित न राहता, माणूस आणि प्राणी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.
23 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित
बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस आणि हिंदचित्र फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ. सुकेशजी झंवर आणि कोमलजी झंवर यांनी केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी सर्व महत्त्वाची जबाबदारी मनिष सुरेश शिंदे यांनी सांभाळली आहे. ‘धाराऊ’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अधिकृत टीझरच्या प्रदर्शनासह आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची चर्चा यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
