जेएनएन, मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका रोमँटिक कथानकाची भर पडणार असून, ‘तुला पाहता’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. “पहिलं प्रेम म्हणजे मनात कायम घर करून राहणारी एक जवळची आठवण” या भावनिक ओळींसह आलेल्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेम, भावना आणि आठवणींचा सुंदर संगम असलेल्या या चित्रपटाची झलक सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

टीझरमध्ये पहिल्या प्रेमाची हळवी भावना, नात्यांमधील बदल आणि मनात कायम राहणाऱ्या आठवणी यांचे भावनिक चित्रण करण्यात आले आहे. “वेळ बदलतो, माणसं बदलतात… पण काही भावना मनात तश्याच राहतात” हा संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट तरुणाईसोबतच प्रेमकथांचे चाहते असलेल्या प्रेक्षकांनाही भावेल, अशी चर्चा रंगली आहे.

चित्रपटात मानसी, नचिकेत लेले, इला भाटे, सतीश पुळेकर, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी पाटील, स्वप्नील परजाणे आणि आकाश शिंदे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती मयूरा यांनी केली असून, Brave Wheel Productions प्रस्तुत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा: 'त्या' प्रकरणावरुन अभिनेत्री उषा चव्हाण यांचा सरकारला अल्टीमेटम, म्हणाल्या...तर पुरस्कार व सन्मानचिन्हे करणार परत