जेएनएन, मुंबई: ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री उषा चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेबाबत गंभीर आरोप करत महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयीन आदेश आणि कायदेशीर हक्कांकडे दुर्लक्ष करून टीडीआर प्रक्रियेत बिल्डर कंपनीला फायदा करून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
उषा चव्हाण यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची मालमत्ता अद्याप अविभाजित असून त्यामध्ये त्यांचा मुलगा हृदयनाथ काडू देशमुख यांचा कायदेशीर हिस्सा असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, संबंधित जमिनीचे क्षेत्रफळ सुमारे 13,546 चौ.मी. असल्याचेही न्यायालयीन पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, पुणे महानगरपालिकेने संपूर्ण 15,066 चौ.मी. क्षेत्रफळाचा टीडीआर अधिग्रहित करून तो गंगा गोयल इंडिया प्रा. लि. या कंपनीला विकत दिल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणात डीआरसी क्रमांक 006506, 006507 आणि 006508 (दिनांक 7 एप्रिल 2026) यांचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद असल्याचे म्हटले. मालमत्ता हक्क, प्रलंबित खटले आणि लेखी पत्रव्यवहार याबाबतची कागदपत्रे जनतेसमोर ठेवण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष
उषा चव्हाण यांनी सांगितले की, या संदर्भात पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, नगरविकास विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी व निवेदने देण्यात आली, मात्र त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. “जर नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या यंत्रणाच अशा प्रकारे वागत असतील, तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे पाहायचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मानचिन्हे परत
“महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आयुष्यभर योगदान दिल्यानंतरही मला माझ्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने दिलेले पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मानचिन्हे परत करण्याचा गंभीर निर्णय मी घेत आहे,” असे त्यांनी जाहीर केले. आवश्यकता भासल्यास हे सन्मान स्व. आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी अर्पण करून निषेध व्यक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वाभिमानाचा प्रश्न
यापुढेही न्याय न मिळाल्यास कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने मोठा लढा उभारण्याचा इशारा देत, “ही केवळ एका अभिनेत्रीची लढाई नसून सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्क, न्याय आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे,” असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले.
हेही वाचा: “मी स्टंटमॅनला ठोसा मारला आणि…”; ‘तस्करी’च्या सेटवरील अपघाताबद्दल अमृता खानविलकरचा खुलासा
