जेएनएन, नागपूर: 'देऊळ बंद 2' या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखक प्रवीण तरडे महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. 10 ते 13 जूनदरम्यान विदर्भ ते खान्देश असा त्यांचा दौरा आयोजित करण्यात आला असून, दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ते आपल्या टीमसह नागपुरात दाखल झाले.
नागपुरात पोहोचताच प्रवीण तरडे यांनी शहरातील प्रसिद्ध तर्री पोह्यांचा आस्वाद घेतला. नागपुरातील सुप्रसिद्ध रामजी-शामजी पोहेवाले यांच्या दुकानात त्यांनी भेट देत पोह्यांचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच चर्चेत आला आहे.
व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे म्हणतात, "आज मला कळलं की देवेंद्र फडणवीस नागपूरच्या तर्री पोह्यांचं इतकं कौतुक का करतात. या पोह्यांची चव खरोखरच लाजवाब आहे." त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे नागपुरातील खाद्यसंस्कृतीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
व्हिडिओसोबतच्या पोस्टमध्ये त्यांनी मिश्किल अंदाजात लिहिले, "देवाभाऊ, तुम्ही सांगितलं म्हणून खाल्लं. आता इथून पुढे नागपूरला आलो की आधी तर्री पोहे आणि मग सावजी!"
रामजी-शामजी पोहेवाले
नागपूरच्या वर्धा रोड परिसरातील रामजी-शामजी पोहेवाले हे अनेक वर्षांपासून आपल्या खास चवीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हातच्या तर्री पोह्यांची चव चाखण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने खाद्यप्रेमी येथे भेट देतात. आता प्रवीण तरडे यांच्या भेटीनंतर या प्रसिद्ध खाद्यपदार्थाची आणि दुकानाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
देऊळ बंद 2
'देऊळ बंद २'च्या कमाईबाबत उपलब्ध ताज्या अहवालांनुसार चित्रपटाने 19 दिवसांत सुमारे 70.40 कोटी रुपयांची जागतिक कमाई केली आहे. दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासह स्नेहल तरडे, मोहन जोशी, प्रसाद ओक आणि महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. प्रभावी कथा, दमदार संवाद, उत्कृष्ट अभिनय आणि भावनिक मांडणी यामुळे 'देऊळ बंद २' हा चित्रपट केवळ भक्तीपट न राहता एक सामाजिक संदेश देणारा चित्रपट म्हणूनही प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
हेही वाचा:
