जेएनएन, नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील लैंगिक अत्याचारप्रकरण आता रुपेरी पडद्यावर झळकणार असून, या प्रकरणावर आधारित चित्रपटाची चर्चा राज्यभर रंगू लागली आहे. या चित्रपटात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. मात्र, चित्रपटाच्या घोषणेनंतरच त्यांना धमकीचे फोन येत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटात काही राजकीय आणि सामाजिक संदर्भ असलेली पात्रे दाखवली जाणार असल्याचे बोलले जात असून, त्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित भूमिका असल्याची चर्चा आहे. याच भूमिकेमुळे काही व्यक्तींनी चित्रपटात काम करू नये, अशी दबावाची भूमिका घेतल्याचा आरोप दीपाली सय्यद यांनी केला.
दीपाली सय्यद म्हणाल्या, “अशोक खरात प्रकरणावर चित्रपट येत असताना आणि मी भूमिका करत असताना कोणत्याही कलाकारावर दबाव आणू नये. मला काही धमकीचे फोन येत आहेत. मात्र, ‘कर नाही त्याला डर कशाचा?’ हे माझं प्रोफेशन आहे. एखादी भूमिका साकारू नये म्हणून जर फोन करून दबाव टाकला जात असेल, तर हे चुकीचं आहे.” कलाकाराला भूमिका साकारण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. एखाद्या सामाजिक किंवा चर्चित विषयावर चित्रपट बनवला जात असेल, तर त्याकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. धमक्या किंवा दबाव टाकून एखाद्या कलाकाराला रोखण्याचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब आहे असेही दिपाली यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अशोक खरात प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. कथित अध्यात्मिक प्रभावाचा वापर करून महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले होते. या प्रकरणामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता त्याच घटनेवर आधारित चित्रपट येत असल्याने पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी कथानक वास्तव घटनांवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटामुळे अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: “सेकंड, थर्ड ओपिनियन घ्या”; कॉकरोच जनता पार्टी वरून अतुल कुलकर्णींंचा सरकारला टोला
