जेएनएन, मुंबई: छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. धर्मरक्षक संभाजी महाराज यांना त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून तसेच संभाजी महाराजांनी धर्माची रक्षा करण्याकरिता सोसलेले हाल आजच्या पिढी पर्यंत पोहचविण्याचा दृष्टिने आजपर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली गेली. अश्यातच आज संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. संदीप मोहिते पाटील यांनी “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज"! या चित्रपटाची घोषणा केली आहे.

संदीप मोहिते पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या चित्रपटाची पहिली झलक दाखविली आहे. आज संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त सकाळी 8 वाजता या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले आहे. जाहीर करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये एका योध्याच्या रूपात संभाजी महाराज व त्यांच्या मागे महादेव व त्याचे भक्त दाखविण्यात आले आहे. 

या चित्रपटात मुख्य भूमिकेत म्हणजेच संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता ठाकूर अनुप सिंग असून, चित्रपटात अमृता खानविलकर व किशोरी शहाणे मुख्य भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप तरी या चित्रपटात कोणत्या भूमिका कोण साकारणार या बद्दल माहिती उघड करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार शेलार यांनी केले असून, उर्विता प्रोडक्शन खाली हा चित्रपट तयार झाला आहे. सौजन्य निकम, केतन भोसले, शेखर मोहिते पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.