जेएनएन, मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवादे यांच्या आई प्रज्ञा जवादे यांचे दीर्घ आजारानंतर कॅन्सरमुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे जवादे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चाहत्यांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

प्रज्ञा जवादे काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि अखेर 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती समजताच मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रसाद जवादे हे त्यांच्या साधेपणा, अभिनय आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. आईशी असलेले त्यांचे अतूट नाते त्यांनी अनेकदा सार्वजनिकरित्या व्यक्त केले आहे. या दुःखद प्रसंगी सहकाऱ्यांकडून त्यांना मानसिक आधार मिळत असून चाहत्यांकडूनही सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान, सासूबाईंच्या निधनानंतर सून अमृता देशमुख हिने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी त्यावर संवेदना आणि आदर व्यक्त केला आहे.

अमृताने पोस्टमध्ये लिहिले आहे, “पहिल्या दिवसापासून तिने मला कधीही सुनेसारखी वागणूक दिली नाही. मी तिची मुलगी होते… अगदी सहज, आपसूकच.” सासू-सुनेच्या नात्यापलीकडे जाऊन आई-मुलीचं जिव्हाळ्याचं नातं प्रज्ञा जवादे यांनी दिल्याचं तिने नमूद केलं आहे.

नात्याला नावांपेक्षा प्रेम महत्त्वाचं असतं, असं सांगत अमृताने “काकू” आणि “मम्मी” या संबोधनाचा उल्लेख केला आहे. नाव बदललं तरी प्रेम मात्र तितकंच शुद्ध, निष्पाप आणि निःशंक राहिलं, असं ती लिहिते. मराठी भाषा, कविता आणि शब्दांवरील प्रज्ञा जवादे यांचं प्रेम हे दोघींमधील एक शांत आणि खोल नातं होतं, ज्यामुळे हे नातं अधिक दृढ झालं.

    पोस्टमध्ये अमृताने प्रज्ञा जवादे यांच्या व्यक्तिमत्त्वाचंही सुंदर वर्णन केलं आहे. “ते तिचे चमकणारे राखाडी डोळे… आणि तीच ऊब जी आजही प्रसादच्या फिकट तपकिरी डोळ्यांमध्ये आहे,” अशा शब्दांत तिने सासू आणि पतीमधील भावनिक साम्य अधोरेखित केलं आहे.

    आपल्यावर केलेल्या प्रेमासाठी कृतज्ञता व्यक्त करत अमृता लिहिते, “तुम्ही मला ज्या प्रकारे जपले, त्याबद्दल कृतज्ञ. तुम्ही माझ्यावर ज्या प्रकारे प्रेम केले, त्याबद्दल कृतज्ञ. नेहमीच तुमची मुलगी.”

    पोस्टच्या शेवटी अमृताने पती प्रसाद जवादे आणि सासरे यांच्याविषयीही अभिमान व्यक्त केला आहे. प्रज्ञा जवादे यांच्या आजारपणात आणि अखेरच्या प्रवासात दोघांनी ज्या प्रकारे त्यांचा हात धरून साथ दिली, ते शब्दांत मांडणे अशक्य असल्याचं तिने नमूद केलं आहे.

    प्रज्ञा जवादे (15 सप्टेंबर 1960 – 28 डिसेंबर 2025) यांच्या निधनाने कुटुंबासह साहित्यप्रेमी आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अमृता देशमुखची ही पोस्ट केवळ सासू-सुनेच्या नात्याची नाही, तर प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या नात्याची साक्ष देणारी ठरते.