जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. एकूण 50 मराठी चित्रपटांना सामाजिक आशय, कलात्मक गुणवत्ता आणि प्रयोगशीलतेच्या बळावर 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली.

मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलताना शेलार म्हणाले की, “हे केवळ आर्थिक साहाय्य नाही; तर विचारांना दिशा देणारे, सामाजिक भान जपणारे आणि तांत्रिक प्रयोगांतून नवे क्षितिज गाठणारे मराठी चित्रपट हे राज्याचे सांस्कृतिक भांडार आहे. अशा निर्मात्यांना शासन सदैव प्रोत्साहन देणार आहे.” 

सामाजिक आशय व कलात्मकतेवर भर!

साहाय्य मिळालेल्या 50 चित्रपटांमध्ये सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे चित्रपट,कला, संस्कृती आणि साहित्याशी निगडित कथानक, प्रयोगशील दिग्दर्शन व तांत्रिक नवकल्पना दर्शवणारे प्रकल्प यांचा समावेश आहे. मंत्री शेलार यांनी सांगितले की, “समाजपरिवर्तनाला चालना देणारे आणि तरुण पिढीला विचार करायला लावणारे चित्रपट जास्तीत जास्त पुढे यावेत, हा सरकारचा उद्देश आहे.”

सरकारचा ‘मराठी चित्रपट उद्योग बळकटीकरण’ उपक्रम!

राज्य शासनाने गेल्या काही वर्षांत निर्मिती खर्च सहाय्यता, चित्रपट महोत्सवांना अनुदान, तांत्रिक शिक्षणासाठी प्रोत्साहन, आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचे वितरण असे अनेक उपक्रम सुरू केले आहेत.

    या संदर्भात शेलार म्हणाले, “मराठी सिनेसृष्टीला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्याने धोरणात्मक निर्णय घेणार आहे.”

    फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर!

    चित्रपटसृष्टीसाठी फिल्म सिटीचा अंतिम मास्टर प्लॅन (Final Master Plan) सरकारने मंजूर केला आहे यामुळे अत्याधुनिक शूटिंग सेटअप, जागतिक दर्जाच्या स्टुडिओ सुविधा,व्हिज्युअल इफेक्ट्स व अॅनिमेशन सेंटर, पोस्ट-प्रॉडक्शन हब यांसारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

    शेलार यांनी स्पष्ट केले की, फिल्म सिटीचा उन्नत आराखडा पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्र पुन्हा देशातील सर्वात मोठं चित्रपट केंद्र बनेल. 

    चित्रपट निर्माते आणि कलाकारांकडून स्वागत!

    सरकारच्या निर्णयाचे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी स्वागत केले आहे. उद्योगातील तरुण निर्मात्यांना बळ नवीन विषय घेऊन काम करणाऱ्या टीमला प्रोत्साहन मिळणार आहे असे मतही कलाकारांनी व्यक्त केले आहे.