नवी दिल्ली/नाशिक l NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्र ते हरियाणा असा मोठा रॅकेट असल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. माहितीनुसार जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष हाच पेपरफुटीचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे.मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधी संभावित प्रश्न माहिती करुन घेतल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
राजस्थान SOG, केंद्रीय तपास यंत्रणा आणि इतर राज्यांतील पोलिसांकडून संयुक्त चौकशी सुरू असून, प्रश्नपत्रिका लीकचे धागेदोरे हरियाण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परीक्षेपूर्वी “गेस पेपर”च्या नावाखाली काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात आली होती. या गेस पेपरमधील 100 हून अधिक प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेशी जुळल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. 
तपासात काय समोर आलं?
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, पेपर लीकचे नेटवर्क अनेक राज्यांमध्ये सक्रिय होते. राजस्थानमधून सुरू झालेल्या तपासात महाराष्ट्रातील नाशिक, त्यानंतर हरियाणा आणि उत्तराखंडपर्यंत कनेक्शन समोर आले आहे. लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या डिजिटल कॉपी सर्वप्रथम नाशिकमध्ये शेअर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याच आधारे तपास यंत्रणांनी काही मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडिया चॅनेल्सची चौकशी सुरू केली आहे. 
कोण आहे मास्टरमाईंड?
या संपूर्ण रॅकेटमागे कोचिंग नेटवर्क, दलाल आणि काही तांत्रिक तज्ज्ञांचा सहभाग असल्याचा संशय आहे. यामध्ये प्रमुख आरोपी मनीष असल्याचा संशय पोलीसकडून व्यक्त केला जात आहे. राजस्थानमध्ये एका PG विद्यार्थ्याच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचा तपासात दावा करण्यात आला असून, त्यानंतर ही प्रश्नपत्रिका विविध राज्यांमध्ये पसरवण्यात आली. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य “मास्टरमाईंड”चा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 
NTAची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!
दरम्यान, परीक्षा होण्यापूर्वी NTAने पेपरफुटीच्या सर्व अफवा फेटाळून लावत परीक्षा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला होता. मात्र, आता मोठ्या प्रमाणावर प्रश्न जुळल्याने NTAवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. 
देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संताप !
या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. “कडक सुरक्षा तपासण्या करूनही पेपर कसा फुटला?” असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत. अनेक ठिकाणी री -NEETची मागणीही जोर धरू लागली आहे.
