जेएनएन, पुणे. महाराष्ट्रातील लाखो स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 29 डिसेंबर रोजी होणारी संयुक्त पूर्वपरीक्षा महाराष्ट्र गट-ब ही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, ही परीक्षा आता 4 जानेवारीला घेतली जाणार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे.

संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

ही संयुक्त पूर्वपरीक्षा दरवर्षी पोलीस उपनिरीक्षक (PSI), राज्य कर निरीक्षक (STI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) या पदांच्या भरतीसाठी घेतली जाते. अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. वेळापत्रकातील ताण, अभ्यासक्रमातील वाढीव भार, तसेच काही तांत्रिक कारणांमुळे आयोगावर प्रचंड दबाव होता.

संयुक्त पूर्वपरीक्षेचे नवीन तारीख किती?

आयोगाने परिस्थितीचा विचार करून शेवटी परीक्षा पुढे ढकलली. नवीन तारखेनुसार परीक्षा 4 जानेवारीला होणार असल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त तयारीसाठी वेळ मिळणार आहे. मात्र अचानक बदललेल्या तारखेमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजीही व्यक्त होत आहे. काही विद्यार्थ्यांनी वेळापत्रकातील वारंवार बदलामुळे मानसिक ताण वाढल्याचे सांगितले, तर काहींनी आयोगाचा हा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले.

    MPSC च्या निवेदनानुसार

    या कारणामुळे पुढे ढकलली संयुक्त पूर्वपरीक्षा

    राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका 2025 कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 2 डिसेंबर, 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर, 2025 रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले आहे. जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेवून त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. 

    नवीन प्रवेशपत्र जाहीर होणार?

    एमपीएससीने विद्यार्थ्यांना विनंती केली आहे की, अधिकृत वेबसाइटवरील पुढील सूचना लक्षात ठेवाव्यात आणि नवीन प्रवेशपत्र (admit card) आवश्यक असल्यास आयोगाकडून वेगळे जाहीर केले जाईल. 

    गोंधळाचे चित्र 

    या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धापरीक्षा वातावरणात पुन्हा एकदा गोंधळाचे चित्र दिसत असले तरी, 4 जानेवारीच्या अंतिम तारखेसाठी आता विद्यार्थी नव्या जोमाने तयारी करत आहेत. 

    अ.क्र.परीक्षा/जाहिरातपरीक्षेचा सुधारित दिनांक
    1.महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 202504 जानेवारी, 2026
    2.महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 202511 जानेवारी, 2026