जेएनएन, पुणे. दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी आता अकरावीच्या तयारीला लागले आहेत. विद्यार्थ्याप्रमाणेच शिक्षण विभागानेही आता केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती दिली आहे. 11 मे पासून इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा भाग-1 आणि भाग-2 भरुन विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करण्याची सुविधा - https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर सुरु झाली आहे.
उद्या शेवटचा दिवस
शैक्षणिक सत्र 2026-27 मधील इयत्ता 11 वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी 12 मे पर्यंत एकूण 887529 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-1 भरुन नोंदणी केलेली आहे. उद्या या प्रक्रियेच्या शून्य फेरीच्या नोंदणीचा शेवटचा दिवस आहे.
सदर प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींकरीता विशेष पाचवी फेरी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी सदर पोर्टलवर उपलब्ध माहिती व सूचनेनुसार आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शैक्षणिक सत्र 2026-27 मधील इयत्ता 11 वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे शून्य फेरी आणि नियमित कॅप फेरी 1 चे वेळापत्रक सोबत सादर करण्यात येत आहे. इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया संदर्भात माहिती, सूचना वेळोवेळी प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. विद्यार्थी/पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल - https://mahafyjcadmissions.in, ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in आणि हेल्पलाईन नंबर 8530955564 याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील डाॅ. पालकर यांनी केले आहे.
| दिनांक (पासून) | दिनांक (पर्यंत) | केंद्रीय प्रवेश प्रक्रिया माहिती |
| 11 May 2026 | 13 May 2026 | 1. शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग 1 सादर करणे. 2. विद्यार्थी एकाच वेळी भाग 2 (कोटा) साठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. (व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्यांक कोट्यासाठी झिरो राउंड) 3. विद्यार्थी किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांची प्राधान्ये भरू शकतो. |
| 14 May 2026 | 15 May 2026 | तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी (PROVISIONAL GENERAL MERIT LIST) प्रदर्शित करणे |
| 16 May 2026 | 16 May 2026 | 1. तात्पुरत्या गुणवत्ता यादीत हरकती / दुरुस्ती मागण्या असल्यास विद्यार्थी लॉगिनमधील “Grievance Redressal” द्वारे सादर करणे. 2. संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्या मार्फत हरकती / दुरुस्ती मागण्यांचे ऑनलाईन निवारण. 3. संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्याकडून तक्रार निवारण अंतिम करणे. |
| 18 May 2026 | 19 May 2026 | 1. सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे (एकदाच होणारी प्रक्रिया). 2. व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्यांक कोट्यासाठी झिरो राउंड वाटप. |
| 19 May 2026 | 19 May 2026 | अल्पसंख्यांक, कोटा, इन-हाऊस व व्यवस्थापन कोट्यासाठी झिरो राउंड प्रवेशासाठी महाविद्यालयनिहाय यादी विभागाकडून दिली जाईल. रिक्त जागा प्रत्यार्पित करणे. |
| 20 May 2026 | 20 May 2026 | रिक्त जागा प्रदर्शित करणे |
| 20 May 2026 | 20 May 2026 | पहिल्या फेरीकरीता जागा प्रदर्शित करणे (कोटा जागांसह) |
