जेएनएन, नागपूर:  मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवणारी "महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलीना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना" प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ही योजना मराठा- कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे. विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी  16 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन सारथीच्यावतीने करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया आणि मदत
इच्छुक विद्यार्थ्यांनी सारथीच्या fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2025 आहे. 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी स्प्रिंग- 2025 (एप्रिल ते मे 2025), फॉल 2025 (जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2025) आणि स्प्रिंग- 2006 (जानेवारी ते मार्च 2026) या कालावधीत प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करु शकतात.

योजनेचा उद्देश आणि व्याप्ती
योजना मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पी. एच.डी क्यु वर्ल्ड युनिव्हसिटी रँकींगमध्ये 200 च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. यामध्ये 50 जागा पदव्युत्तर पदवी/पदविका आणि 25 जागा पीएच.डी च्या विविध अभ्यासक्रमासाठी राखीव आहेत.

शिष्यवृत्तीचे स्वरुप
योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता आणि वैयक्तिक आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. प्रतीवर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल 30 लाख रुपये आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी कमाल 40 लाख रुपये या मर्यादेत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

पात्रता निकष
लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा-कुणबी जातीतील महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारतीय नागरिक असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावी. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वय 35 वर्ष आणि पीएच.डी साठी 40 वर्षे असावे. कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षातील सर्व मार्गांनी प्राप्त एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यापीठ प्रवेश पात्रता क्युएस वर्ल्ड युनिव्हसिटी रँकिंग 200 च्या आत असलेल्या परदेशी विद्यापीठात पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी अनकंडीशनल ऑफर लेटर असणे आवश्यक आहे. पूर्वी कोणतीही राज्य किंवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. अर्धवेळ किंवा एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत.

अधिक माहितीसाठी सारथीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा सारथी विभागीय कार्यालय, वनामती, नागपूर परिसर येथील इमारत(शरद व ग्रीष्म), व्ही.आय.पी. रोड, धरमपेठ, नागपूर 440010 दुरध्वनी क्र. 0712- 2992878येथे संपर्क साधावा