नवी दिल्ली. Rule Chaning from 1st September: सप्टेंबर महिना सुरू झाला असून आजपासून असे अनेक मोठे बदल झाले आहेत, ज्यांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर पडणार आहे. दुधाचे दर असो किंवा बोर्डिंग पासशी संबंधित नियम, हे सर्व नियम प्रत्येक व्यक्तीशी जोडलेले आहेत. अशा वेळी काही नियमांचा खिशावर मोठा भार पडणार आहे, तर काही नियमांमुळे दिलासा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आजपासून बदलणारे सर्व नियम

1. एलपीजी सिलिंडरची ई-केवायसी (e-KYC)

घरगुती एलपीजी सिलिंडरची (LPG Cylinder) ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 होती. जर तुम्ही केवायसी केली नसेल, तर आता तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत सिलिंडर बुकिंगमध्ये अडचण येऊ शकते, तसेच तुम्हाला सिलिंडरवर सबसिडी मिळत असल्यास तीही थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही अडचण टाळण्यासाठी त्वरित तुमच्या गॅस वितरक  कंपनीशी संपर्क साधावा.

2. कार खरेदी करणे झाले महाग

जर तुम्ही या महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला झटका बसू शकतो. आज म्हणजेच 1 सप्टेंबरपासून टाटा (Tata) आणि ह्युंदाई (Hyundai) च्या गाड्या महाग झाल्या आहेत. टाटा मोटर्सने आपल्या सर्व व्हेरियंट्सच्या गाड्या आणि एसयूव्हीच्या किमती 25,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत, तर ह्युंदाईनेही या वर्षात आपल्या कारच्या किमती पुन्हा वाढवल्या आहेत.

3 आजपासून दुधाचे दरही महागणार -

    मुंबईतील नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. आजपासून मुंबईत तबेल्यातील दूध ₹9 ने महाग झाले आहे. म्हणजेच, पूर्वी जे दूध ₹93 प्रतिलिटर मिळायचे, ते आता ₹102 प्रतिलिटर दराने मिळेल. यासोबतच मुंबईत आजपासून ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ झाली आहे. टॅक्सीच्या भाड्यात ₹2 प्रति किमी, तर ऑटोच्या भाड्यात ₹1 प्रति किमीची वाढ करण्यात आली आहे.

    4. परदेश प्रवास झाला सुलभ

    परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आजपासून एक अत्यंत दिलासादायक नियम लागू झाला आहे. आता भारतातून परदेश प्रवास करताना विमानतळावरील इम्रिग्रेशन काउंटरवर बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष (फिजिकल) शिक्का मारण्याची जुनी कटकट संपली आहे. आता प्रवासी आपल्या मोबाईलवर इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पास किंवा त्याची प्रिंटेड कॉपी दाखवून इम्रिग्रेशन प्रक्रिया सहज पूर्ण करू शकतात.

    5. गोल्ड-सिल्वर ईटीएफच्या (ETF) नियमांत बदल

    भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ म्हणजेच 'सेबी'ने (SEBI) ईटीएफ (ETF) व्यवहारांबाबत नवीन नियम लागू केले आहेत, जे १ सप्टेंबरपासून अमलात आले आहेत. नवीन नियमांनुसार, ईटीएफची किंमत मर्यादा निश्चित करण्यासाठी मागील व्यवहाराच्या दिवसातील शेवटच्या 30 मिनिटांतील ट्रेडिंग व्हॉल्यूमची सरासरी किंमत आधार मानली जाईल. यामुळे ईटीएफची किंमत बाजाराच्या ताज्या परिस्थितीनुसार कायम राहील.