नवी दिल्ली: ESIC-Aadhaar Linking: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत विमाधारक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आले आहे. आपली प्रणाली पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी, ESIC ने सर्व विमाधारक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधार लिंकिंग (Aadhaar linking) अनिवार्य केले आहे.

जर तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबीयांचे आधार कार्ड अद्याप ईएसआयसी विमा क्रमांकाशी जोडले नसेल, तर तुम्हाला वैद्यकीय उपचार, मोफत औषधे, प्रसूती लाभ आणि रोख लाभ मिळवण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात.

ESIC आधार लिंकिंग अनिवार्य का करण्यात आले आहे?

1. फसवणूक रोखणे: एकाच व्यक्तीद्वारे केली जाणारी अनेक खाती आणि खोटे दावे दूर करणे.

2. जलद आणि कॅशलेस उपचार: ईएसआयसी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये बायोमेट्रिक पडताळणीमुळे रुग्णाची त्वरित ओळख सुनिश्चित होईल, ज्यामुळे कोणत्याही कागदपत्रांशिवाय अखंड उपचार शक्य होतील.

3. डॉयरेक्ट बेनिफिट ट्रांसफर (DBT): आजारपण लाभ, बेरोजगारी भत्ता (Sickness benefit), प्रसूती लाभ (maternity benefit) आणि कायमस्वरूपी अपंगत्व भत्ता यांची रक्कम कोणत्याही विलंबाशिवाय थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

    कोणत्या सदस्यांसाठी आधार लिंकिंग अनिवार्य आहे?

    ज्या कर्मचाऱ्याच्या पगारातून ईएसआयसी (ESIC) योगदानासाठी कपात केली जाते, त्याचा आधार क्रमांक जोडणे ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. कर्मचाऱ्याचे आई-वडील, जोडीदार आणि मुलांची आधार ओळख सीडिंग देखील आवश्यक आहे.

    ईएसआयसी पोर्टलवर आधार लिंक करण्याच्या स्टेप्स-

    स्टेप्स 1: ESIC च्या अधिकृत वेब पोर्टलला (www.esic.gov.in) भेट द्या आणि होमपेजवर दिलेल्या insured Person/Beneficiary Portal लिंकवर क्लिक करा.

    स्टेप्स 2: तुमचा ESIC विमा क्रमांक, पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा. (जर तुम्ही पहिल्यांदाच पोर्टल वापरत असाल, तर साइनअप पर्याय निवडा आणि नवीन पासवर्ड सेट करा.)

    स्टेप्स 3: लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला डॅशबोर्डवर "Aadhaar Seeding For IP" चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.

    स्टेप्स 4: यानंतर एक लिंक उघडेल, त्या लिंकवर ज्या व्यक्तीचा आधार लिंक करायचा आहे, त्या व्यक्तीच्या नावापुढे दिलेल्या ॲक्शन बटणावर क्लिक करा.

    स्टेप्स 5: संबंधित व्यक्तीचे नाव, जन्मतारीख आणि आधार तपशील अचूकपणे भरा.

    स्टेप्स 6: तुम्हाला आधारशी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळेल. तो ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि व्हेरिफायवर क्लिक करा.

    स्टेप्स 7: ओटीपी पडताळणी पूर्ण झाल्यावर, मंजुरीसाठी तुमच्या कंपनी/नियोक्त्याच्या लॉगिन पोर्टलवर विनंतीवर प्रक्रिया केली जाईल. नियोक्त्याने डिजिटल मंजुरी दिल्यानंतर, तुमचा आधार ESIC डेटाबेसशी यशस्वीरित्या जोडला जाईल.

    आधार लिंकिंग न केल्यास काय नुकसान होईल?

    ईएसआयसी दवाखान्यात किंवा खाजगी सूचीबद्ध रुग्णालयात दाखल होताना ओळख सिद्ध करणे अवघड बनू शकते. रोख लाभ आणि क्लेम निकाली काढण्याच्या प्रक्रियेस विलंब होऊ शकतो.