पीटीआय, नवी दिल्ली. PM Fasal Bima Yojana: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान सोमवारी (आज) प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत 30 लाख शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये हस्तांतरित करणार आहेत.
अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना 1156 कोटी, राजस्थानच्या 7 लाख शेतकऱ्यांना 1121 कोटी, छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना 150 कोटी आणि इतर राज्यांतील शेतकरी लाभार्थ्यांना 773 कोटी रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
झुंझुनू येथे होणार कार्यक्रम
लाभार्थ्यांना या रकमेचे वितरण राजस्थानच्या झुंझुनू येथील एका कार्यक्रमात केले जाईल. यात कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री किरोडी लाल मीणा हेही प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देणार आहे.
विम्यासाठी आता नवीन नियम
या कार्यक्रमात केवळ निधीचे वितरणच नाही, तर शेतकऱ्यांसाठी एका महत्त्वाच्या नियमाचीही अंमलबजावणी होणार आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, खरीप 2025 च्या हंगामापासून हे निश्चित करण्यात आले आहे की, अनुदानाच्या योगदानात राज्य सरकारांनी उशीर केल्यास त्यांच्यावर 12 टक्के दराने दंड आकारला जाईल. त्याचप्रमाणे, विमा कंपन्यांनी पेमेंटमध्ये उशीर केल्यास, कंपन्यांना शेतकऱ्यांना 12 टक्के दराने दंड द्यावा लागेल. या निर्णयामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर मिळण्यास मदत होईल आणि त्यांना आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा एक मोठे पाऊल मानले जात आहे.