मुंबई. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.त्याचा थेट परिणाम भारतातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होत आहे. विशेषतः सोयाबीन, सूर्यफूल, राई आणि पाम तेलाच्या किमतींमध्ये 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली असून, दररोज भाव वाढत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयातीवर अवलंबून आहे. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे तेल वाहतूक मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. जहाज वाहतुकीला उशीर, विमा खर्चात वाढ आणि काही मार्गांमध्ये बदल केल्यामुळे पुरवठा घटला आहे. परिणामी घाऊक बाजारात तुटवडा जाणवत असून त्याचा परिणाम किरकोळ दरांवर होत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठांमध्ये दरवाढीचा सिलसिला कायम आहे. किराणा दुकानांपासून मोठ्या घाऊक बाजारापर्यंत सर्वच स्तरांवर खाद्यतेल महाग झाले आहे. विशेषतः पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे.
दरम्यान, कच्च्या तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने इंधन दरवाढीचीही भीती निर्माण झाली आहे. पेट्रोल-डिझेल महागल्यास वाहतूक खर्च वाढणार आणि त्याचा परिणाम इतर जीवनावश्यक वस्तूंवरही होणार, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत आधीच काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच दरवाढ झाल्यास स्वयंपाकाचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरगुती अर्थकारणावर दुहेरी ताण निर्माण होत आहे.
वाहन वापरून रोज कामावर जाणारे कर्मचारी तसेच डिलिव्हरी सेवा देणारे युवक यांच्यातही चिंतेचे वातावरण आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे त्यांचा दैनंदिन खर्च वाढण्याची शक्यता असून उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती तात्पुरती असली तरी युद्ध दीर्घकाळ चालल्यास महागाई आणखी वाढू शकते. त्यामुळे सरकारने पर्यायी आयात मार्ग, साठा व्यवस्थापन आणि दर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
