मुंबई - नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात सर्वसामान्यांसाठी महागडी ठरणार असून 1 एप्रिलपासून ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत वाढ होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या दरांचा थेट परिणाम ग्राहकांवर होत असून कार, टीव्ही, फ्रीज आणि एसीच्या किमतीत 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
कच्चा माल महागल्याचा थेट परिणाम-
प्लास्टिक, रेझिन आणि पॉलिमर यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ ही या दरवाढीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्मितीत या घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी कंपन्यांनी किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहन क्षेत्रालाही फटका-
ऑटोमोबाईल क्षेत्रातही उत्पादन खर्च वाढला असून वाहन निर्मितीसाठी लागणारे धातू, प्लास्टिक आणि इतर घटक महागले आहेत. त्यामुळे कार उत्पादक कंपन्याही एप्रिलपासून किमतीत वाढ करण्याच्या तयारीत आहेत.
वाहतूक खर्चात वाढ-
आंतरराष्ट्रीय स्तरावर मालवाहतुकीचे दर 7 ते 10 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे आयात होणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च अधिक वाढला आहे. त्याचा परिणाम अंतिम उत्पादनाच्या किमतीवर होत आहे.
रुपयाच्या घसरणीचाही परिणाम-
भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सुमारे २ टक्क्यांनी घसरल्याने आयात माल महाग झाला आहे. यामुळे कंपन्यांचा खर्च वाढून त्याचा भार ग्राहकांवर टाकला जात आहे.
ग्राहकांवर दुहेरी भार-
उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च या दोन्हीमध्ये वाढ झाल्याने कंपन्यांसमोर किंमत वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे एप्रिलपासून ग्राहकांना कार खरेदी करताना तसेच घरगुती उपकरणे घेताना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
खरेदीचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता!
दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहक खरेदीचा निर्णय पुढे ढकलू शकतात. मात्र, ज्यांना तातडीने खरेदी करायची आहे, त्यांनी मार्चअखेरपर्यंतच खरेदी केल्यास काही प्रमाणात बचत होऊ शकते. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि रुपयातील घसरण यामुळे एप्रिलपासून महागाईचा आणखी एक फटका बसणार असून त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे.
