नवी दिल्ली: Syed Mushtaq Ali Trophy : उदयोन्मुख भारतीय क्रिकेट स्टार वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) मंगळवारी पुन्हा एक ऐतिहासिक खेळी केली. 14 व्या वर्षी तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला.
बिहारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने ईडन गार्डन्सवर महाराष्ट्राविरुद्ध नाबाद शतक झळकावले. डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या 61 चेंडूत सात चौकार आणि सात षटकारांसह नाबाद 108 धावा केल्या. वैभवच्या खेळीमुळे बिहारला 20 षटकांत 3 बाद 176 धावा करता आल्या.
वैभवने कसे पूर्ण केले आपले शतक?
अर्शीन कुलकर्णीने टाकलेल्या 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून वैभव सूर्यवंशीने आपले शतक पूर्ण केले. त्याने 58 चेंडूत शतक पूर्ण केले. वैभवच्या खेळीत संयम आणि आक्रमकतेचे अद्भुत मिश्रण दिसून आले.
वैभव सूर्यवंशीचे शतक एका महत्त्वाच्या वेळी आले. मागील तीन सामन्यांमध्ये तो 14, 13 आणि 5 धावांवर बाद झाला होता. सामन्यात वैभवने आकाश राज (26) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर आयुष लोहारुका (25*) सोबत नाबाद 75 धावांची भागीदारी केली.
देवदत्त पडिक्कलने शतक झळकावले
वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त, देवदत्त पडिक्कलने कर्नाटककडून अहमदाबादमध्ये तामिळनाडूविरुद्ध शानदार शतक झळकावले. मयंक अग्रवालसोबत डावाची सुरुवात करताना पडिक्कलने केवळ 26 चेंडूत आपले अर्धशतक आणि 45 धावांत आपले शतक पूर्ण केले. डावखुरा फलंदाज वैभवने नाबाद 102 धावा करताना 10 चौकार आणि सहा षटकार ठोकले.
देवदत्त पडिक्कलच्या खेळीमुळे कर्नाटकने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 245 धावा केल्या. मंगळवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दोन डावखुऱ्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. दोघांनीही (वैभव आणि देवदत्त) नाबाद शतके ठोकून त्यांच्या संघाला एक मजबूत धावसंख्या गाठण्यास मदत केली.
